Aurangabad : शिवचरित्र पारायण वाचन उपक्रम देशात पहिलाच ;संभाजीराजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजीराजे

Aurangabad : शिवचरित्र पारायण वाचन उपक्रम देशात पहिलाच ; संभाजीराजे

औरंगाबाद : शिवचरित्र पारायण सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.१४) भाजप जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने तर मिलिंद पाटील यांच्या हस्ते पारायण वाचन सुरू झाले.

सोहळ्यात संभाजीराजे छत्रपती यांनी शिवचरित्र पारायणाची सांगता शिवआरती करून केली. संभाजीराजे म्हणाले, की हा शिवचरित्र पारायण वाचनाचा कार्यक्रम देशातील पहिलाच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्यात जात-धर्म न पाहता, सैनिकाच्या शौर्यावर, मर्दुमकीवर, त्याच्या इमानावर सैन्यात भरती करून पदे दिली.

शिरीष बोराळकर म्हणाले की, औरंगाबादमधून हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्‍चन सर्व धर्मीयांना बरोबर घेऊन हा शिवचरित्र पारायण वाचनाचा कार्यक्रम आपल्या शहरातून होत आहे. सर्व माध्यमाची मुले-मुली यामधे सहभागी होत आहेत. यातून सामाजिक एकतेचा संदेश जात आहे.

दुसऱ्या दिवशी मराठी व उर्दू १२ शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. मुलांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पोवाडे, भाषणे सादर केली. चार वर्षांच्या स्वराजने सुंदर खड्या आवाजात पोवाडा गायला. सप्ताह समितीचे संस्थापक प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, एस. पी. जवळकर, मिर्झा सलीम बेग, गोविंद गोंडे पाटील, श्रीमती शिंदे, श्रीमती जाधव, दिव्या पाटील, रेखा वहाटुळे यांची उपस्थिती होती.