MSEDCL : महावितरणचा बळिराजाच्या जिवाशी खेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad MSEDCL

MSEDCL : महावितरणचा बळिराजाच्या जिवाशी खेळ

सिल्लोड : तालुक्यात आता रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. वीजेचे वेळापत्रक ठरलेले असताना देखिल सुरळीत विद्युत पुरवठा होत नसून, पिकांना पाणी देण्यासाठी जिवाशी खेळ करीत शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतशिवारात जावे लागत आहे. त्यातही गत आठ दिवसांपासून शेतशिवारातील वेळापत्रकानुसार होत असलेला थ्रीफेजचा पुरवठा कमी दाबाने होत असल्याने बळिराजाच्या अडचणीत भर पडल्याचे चित्र आहे.

सध्या तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचे विद्युतपंप जळाले तर पिकांना पाणी देणे देखिल अडचणीचे होत आहे. दरवर्षीच रब्बीची पेरणी झाल्यानंतर महावितरणच्या रजाकारी कारभाराचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. हे सर्व घडत असताना लोकप्रतिनिधी मात्र चुप्पी साधून बसले असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. थ्रीफेजचा विद्युत पुरवठा शेतकऱ्यांना अडचणीचा होत असताना शेतशिवारात वास्तव्यास असलेल्या शेतकऱ्यांना सिंगल फेजचा पुरवठा देखिल होत नाही. शेतशिवारात रब्बीच्या पिकांना पाणी देण्यासह, कापसाची वेचणी तसेच इतर मशागतीची कामे करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे गावातील बिऱ्हाड शेतामध्ये हलविले आहे. शेतशिवारातील कापसावर चोरटे डल्ला मारत असल्याच्या घटना घडत आहेत.

तसेच शेतशिवारात चोरट्यांची दहशत देखिल आहे. अशामुळे शेतकऱ्यांना शेतशिवारात रात्रीच्या वेळी नियमितपणे सिंगलफेज विद्युत पुरवठा देणे आवश्यक आहे.

परंतु असे होत नसल्याने महावितरणच्या मनमानी कारभारास शेतकरी वैतागले आहे. मुजोर झालेले अधिकारी, कर्मचारी नेहमीच उद्धटपणे सर्वसामान्यांना वागणूक देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

रवी वसुलीसाठी तगादा लावून शेतकऱ्यांना हैराण करणारे अधिकारी, कर्मचारी विद्युत पुरवठ्याच्या सुरळीत होण्याकडे मात्र, कधीच लक्ष देत नाही. यामुळे आता शेतकऱ्यांच्या मानगुटीवर अस्मानीनंतर महावितरणच्या सुलतानी संकटाचे भूत बसले आहे.

शेतशिवारात दिवसपाळी, रात्रपाळीतील थ्रीफेजचा विद्युत पुरवठा कायम कमी दाबाने होत आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री लाईट आली की शेतशिवारात जावे लागत आहे. परंतु विस्कळित असलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे विद्युत पंप सुरू होत नसून, जळून जात आहे. पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांचा कोणी वाली उरला नाही.

- गणेश दौड, शेतकरी, पानवडोद खुर्द (ता.सिल्लोड).