Aurangabad : ड्रोन कॅमेऱ्यांचा शहरावर ‘वॉच’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drone security

Aurangabad : ड्रोन कॅमेऱ्यांचा शहरावर ‘वॉच’

औरंगाबाद : स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहरात मुख्य रस्ते, चौकांमध्ये ७०० सिसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले आहेत. त्यात आता पाच ड्रोन कॅमेऱ्यांची भर पडणार आहे. स्मार्ट सिटीने आईस्कोप प्रकल्पाअंतर्गत हे कॅमेरे खरेदी केले असून, यातील तीन ड्रोन पोलिसांना दिले जाणार आहेत. एक महापालिकेला तर एक स्मार्ट सिटीकडे राहणार आहे.

स्मार्ट सिटी अभियाअंतर्गत शहरात एमएसआय प्रकल्प राबविण्यात आला. त्यात ‘सेफ सिटी’साठी सातशे कॅमेरे बसविण्यात आले. शहरातील मुख्य रस्ते, चौकांमध्ये हे कॅमरे असून, पोलिस आयुक्त हद्दीतील संपूर्ण पोलिस ठाणे जोडण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांना गुन्हेगारांवर वचक ठेवण्यास मदत होत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे एक कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रूममधून पोलिस आयुक्तालयात तर दुसरे स्मार्ट सिटी कार्यालयात आहे.

दरम्यान २८ कोटी रुपये खर्च करून आयस्कोप प्रकल्प राबविला जात आहे. त्यात अत्याधुनिक १५२ कॅमेऱ्यांची भर पडणार आहे. त्यात फेसरिडींग, एनपीआर (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉन्सिलिएशन) कॅमेऱ्यांचा समावेश आहे. या अत्याधुनिक कॅमेऱ्यांमुळे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना थेट पावती मिळणार आहे. त्यासोबतच आता पाच ड्रोनची खरेदी करण्यात आली आहे. पाच पैकी तीन ड्रोन पोलीसांना तर एक महापालिका व एक स्मार्टसिटीसाठी राहणार आहे.

दोन किलोमीटरपर्यंत राहणार रेंज

सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून ड्रोनची खरेदी करण्यात आले आहेत. या ड्रोनची दोन किलोमीटरपर्यंत रेंज असून २०० मिटर उंचीवरून क्षणचित्रे व फोटो घेता येतील. ८०० मिटरपर्यंतचा परिसर झूम करून पाहता येऊ शकतो. सध्या ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण महापालिका व पोलिस कर्मचाऱ्यांना दिले जात आहे.

यासाठी होणार वापर

पोलिस विभाग या ड्रोन कॅमऱ्यांचा वापर विविध सण समारंभ, यात्रा, गणेशोत्सव, जयंती, मोर्चे, आंदोलने, दंगल सदृश्‍यस्थितीच्या काळात वापर करणार आहेत. महापालिकेला या ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर रस्त्यांचे सर्वेक्षण करणे, विविध प्रकल्पाच्या ठिकाणी छायाचित्र घेणे यासह इतर कामांसाठी होणार असल्याचे स्मार्ट सिटीतर्फे सांगण्यात आले.