
औरंगाबाद स्मार्ट सिटी - मेट्रो मार्गातून छावणीला वगळणार!
औरंगाबाद : वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा डीएमआयसीला जोडणाऱ्या मेट्रो रेल्वेचा डीपीआर तयार करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने महामेट्रोला (Mahametro) (महाराष्ट्र रेल्वे कार्पोरेशन लि.) शुक्रवारी (ता. १४) कार्यारंभ आदेश दिले आहेत. या मार्गात छावणी परिषदेचा मोठा भाग असून, संरक्षण खात्याकडून त्यासाठी परवानगी घेणे जिकिरीचे आहे. त्यामुळे छावणी परिषदेचा भाग वगळून अन्य मार्गाने मेट्रो रेल्वे नेता येईल का? यावर महामेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत प्राथमिक स्वरूपात चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा: योगींची परीक्षा
झपाट्याने विकसित होणाऱ्या औरंगाबाद शहरासाठी आता मेट्रो रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
त्यानुसार औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे सीईओ तथा महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी महामेट्रोला मेट्रोचा डीपीआर तयार कण्यासंदर्भात कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्यानुसार येत्या आठ-नऊ महिन्यात वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा डीएमआयसी अशी मेट्रो रेल्वे व एकच उड्डाणपूल उभारण्यासंदर्भात डीपीआर तयार होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: एकतर्फी बदल अमान्य : लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे
त्यापूर्वी चार महिन्यात शहराचा सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा (सीएमपी) तयार केला जाणार आहे. दरम्यान, मेट्रोचा मार्ग निश्चित करताना छावणी भागाला अन्य पर्याय काय? यावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. छावणी परिषदेतून मेट्रो व उड्डाणपूल करायचा झाल्यास त्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून ना-हरकत घ्यावी लागणार आहे. हे काम मोठे जिकिरीचे आहे. गोलवाडी चौकापासून छावणीची हद्द सुरू होते तर महावीर चौकात ती संपते. केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाकडून परवानगी मिळाली नाही म्हणून या रस्त्याचे रुंदीकरण गेल्या अनेक वर्षांत होऊ शकले नाही. हा अनुभव पाहता छावणी भाग मेट्रोतून वगळल्यास अन्य पर्यायी रस्त्यांवर चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
हेही वाचा: पाकच्या सुरक्षा धोरणाकडे दुर्लक्ष नको
बीड बायपास असू शकतो पर्याय
वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा डीएमआयसी असा उड्डाणपूल व मेट्रो रेल्वे सुरू करताना छावणी भाग वगळला तर अन्य पर्यायामध्ये बीड बायपासचा विचार होऊ शकतो. एसएस क्बबपासून हा मार्ग निघू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
Web Title: Aurangabad Smart City Metro Route Exclude
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..