Aurangabad : अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थ्याने संपविले जीवन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suicide

Aurangabad : अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थ्याने संपविले जीवन

औरंगाबाद : हडकोतील मयुरनगर भागात अभ्यासाच्या तणावातून एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा रविवारी (ता.२९) प्रकार उघडकीस आला. वैभव नारायण खंडाळकर (२१) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. वैभव खंडाळकर एका महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकत होता.

मात्र त्याचा एक विषय निघत नसल्याने तो गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. एक दिवस आधीच त्याचे वडील नारायण खंडाळकर यांना कंपनीत रविवारी सुट्टी असल्याने पत्नीसह चाळीसगाव येथे दर्शनासाठी गेले होते. तर दुपारी वैभवची बहिण ही शिकवणीसाठी गेली होती. त्यामुळे वैभव हा घरी एकटाच होता.

यावेळी त्याने समोरील मुख्य दरवाजाला बाहेरून कुलूप लावले. तसेच पाठीमागच्या दाराने घरात प्रवेश करून घरातील खोलीतील सिलिंग फॅनला साडी बांधून गळफास घेतला. दुपारी त्याची बहिण परत आली. मात्र, दरवाजाला कुलूप असल्याने तिने वडिलांना फोन करून दादा बाहेर गेला असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी आम्ही रात्री परतणार असून मुलीस मावशीकडे थांबण्यास सांगितले. रात्री दहा वाजता ते परत आले.

त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या चावीने कुलूप उघडून घरात प्रवेश केल्यावर वैभवने गळफास घेतल्याचे समोर आले. त्यांनी आरडाओरड केल्याने शेजारी धावून आले. त्यांनी पोलिसांना फोन करून वैभवला बेशुद्ध अवस्थेत घाटीत आणले. मात्र डॉक्टरांनी वैभवला तपासून मृत घोषित केले. वैभव हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.