Aurangabad Suicide Case : आई, बाबा माफ करा, पुढील जन्मात ऋण फेडीन... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Suicide note

Aurangabad Suicide Case : आई, बाबा माफ करा, पुढील जन्मात ऋण फेडीन...

औरंगाबाद : एकतर्फी प्रेमातून संशोधन करणाऱ्या तरुणाने स्वतःवर पेट्रोल ओतून घेतल्यानंतर तरुणीला कवटाळल्याचा प्रकार सोमवारी (ता.२१) दुपारी शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था परिसरात घडला होता. यातील तरुण गजानन खुशालराव मुंडे (३०, रा. दिग्रस दाभा, ता. जिंतूर, जि. परभणी) याचा मध्यरात्रीदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी तरुणाच्या वसतिगृहातील खोलीचा पंचनामा केला असता, त्याने फळ्यावर लिहिलेली सुसाइड नोट सापडली. त्यामध्ये ‘आईबाबा मला माफ करा, पुढील जन्मात तुमचे ऋण फेडील’, सदर तरुणीने माझ्याकडून अडीच लाख रुपये उकळले, तिच्यामुळे मला खूप त्रास झाला, तुम्हांलाही ती त्रास देईल, सत्य हरणार नाही’ अशा आशयाचा मजकूर लिहिल्याचे पोलिसांना सापडले.

गजानन हा विद्यापीठातील संशोधन करणाऱ्या मुलांच्या वसतिगृह क्रमांक दोनमधील खोलीत एकटाच राहत असे. पोलिसांनी त्याच्या खोलीची पाहणी केली असता, फळ्यावर वरील मजकूर असलेला सापडला. त्यासोबतच तारीख नसलेली एक चिठ्ठीही सापडली असून त्यामध्ये संबंधित तरुणी आपणास त्रास देत असल्याचे नमूद केले आहे. बेगमपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी चिठ्ठी जप्त केली.

माझा पाठलाग करतोय

भाजलेल्या अवस्थेत तिच्यावर उपचार सुरू करण्यात आल्यानंतर निरीक्षक पोतदार यांनी तिचाही जबाब नोंदविला असून त्यामध्येही तिने गजानन हा माझा पाठलाग करतो, अनेकदा शिवीगाळ केल्याचेही तिने जबाबात सांगितल्याची माहिती निरीक्षक पोतदार यांनी दिली. विशेष म्हणजे, याआधीही याच आशयाची तक्रार घेऊन ती पोलिस ठाण्यात गेली होती, तेव्हा पोलिसांनी दोघांचे समुपदेशन करून पाठविले होते.

दुसऱ्या दिवशी उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी घटनास्थळी जाऊन संबंधितांचे जबाब घेतले. यामध्ये दोघांना कोण कोण ओळखत होते, शेवटचे कोणी कसे, कुठे पाहिले, दोघांचे पीएचडीचे मार्गदर्शक प्राध्यापक कोण होते, घटनेदरम्यान कोण उपस्थित होते, यासंदर्भात माहितीसह घटनेच्या अनुषंगाने पुरावे गोळा करण्याचे काम दुसऱ्या दिवशी पोलसांनी केले.

दोन महिन्यांपासून गजानन होता नैराश्यात

मृत गजानन हा वसतिगृहातील खोलीत जरी एकटा राहत असला तरी येता जाता तसेच मित्रांना भेटल्यावर तो एकटेपणात जगत असल्याचे दिसत होते, तसेच मागील दोन महिन्यांपासून नैराश्यात राहत असल्याची माहिती वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी दिली. पोलिसांना सुसाइड नोटसह काही प्रिंट काढलेल्या सापडल्या. गजाननने संबंधित तरुणीसोबत व्हॉट्सॲपवर केलेल्या चॅटिंगचे स्क्रीन शॉट काढून त्याच्या प्रिंट काढून ठेवलेल्या पोलिसांना सापडल्या. यावेळी पोलिस उपायुक्त अपर्णा गीते, सहायक आयुक्त अशोक थोरात, निरीक्षक गीता बागवडे, निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा हजर होता. बेगमपुरा ठाण्यात तरुणीच्या मुलीच्या नातेवाइकांच्या तक्रारीवरून मृत गजानन व त्याच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक गीता बागवडे करत आहेत.