esakal | औरंगाबाद : जीवे मारण्याचा धाक दाखवून लुटले । Aurangabad
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : जीवे मारण्याचा धाक दाखवून लुटले

औरंगाबाद : जीवे मारण्याचा धाक दाखवून लुटले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : घराचा दरवाजा जोरजोरात वाजवून न उघडल्यामुळे तिघांनी वृध्द दाम्पत्यासह त्याच्या मुलाला बांधून ठेवत लुटमार केली. ही खळबळजनक घटना बुधवारी पहाटे साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान बीड बायपास रस्त्यावरील न्यू गणेशनगरात घडली. यावेळी लुटारुंनी सोन्याचे दागिने, मोबाइल आणि इन्व्हर्टर हिसकावून नेले. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश राधाकिसन होनमाने (३६, रा. न्यू गणेशनगर, सहारा सिटीसमोर, बीड बायपास) हे घरात झोपलेले असताना पहाटे साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान तीन लुटारुंनी त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, दरवाजा न उघडल्यामुळे तिघांपैकी एकाने घराबाहेर ठेवलेल्या ड्रमवर उभे राहून दरवाजावरील रिकाम्या जागेतून लाकडी दांड्याने होनमाने यांच्या वडिलांच्या डोक्यावर दोनवेळा वार केला. तसेच दरवाजा उघड नाही तर मारुन टाकीन अशी धमकी दिली.

या भितीपोटी होनमाने यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर आत शिरलेल्या तिन्ही लुटारुंनी होनमाने यांच्या आई व वडिलांना बेदम मारहाण केली. तसेच प्रकाश यांच्यासह आई व वडिलांना पलंगावर झोपवून दोरीने बांधले. त्यानंतर या लुटारुंनी दोन हजारांचा मोबाइल, सोन्याची कर्णफुले मंगळसूत्र व इर्न्व्हेटर असा ऐवज लांबवला.

तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकारानंतर होनमाने कुटुंबियांनी स्वत:ची कशीबशी सुटका करुन घेत पोलिसांशी संपर्क साधला. होनमाने यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक संजय मांटे करत आहेत.

loading image
go to top