Aurangabad : बर्निंग बसचा थरार

वरूड काजी फाट्यावर चालकामुळे जीवितहानी टळली
aurangabad news
aurangabad newsesakal
Updated on

चितेपिंपळगाव : करमाड ते सिडको मार्गावर धावणाऱ्या स्मार्ट सिटीबसने पेट घेतल्याची घटना औरंगाबाद- जालना मार्गावरील वरूड काजी फाट्याजवळ रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. बसने पेट घेण्यापूर्वीच चालकाने प्रवाशांना बसमधून खाली उतरवल्याने बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी बालंबाल बचावले. या आगीत बसचा घटनास्थळीच कोळसा झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (ता.१८) दुपारी १२.३० च्या सुमारास सिटी बस क्रमांक-४३ (एमएच-२०, ईएल-१३६३) करमाडवरून सिडको बसस्थानकाकडे प्रवाशांना घेऊन निघाली होती.

दरम्यान, बसच्या चाकांमधून आवाज येत असल्याचे चालक नारायण बैनाजी थोटे आणि वाहक अमोल विनायक नवल यांच्या लक्षात आले. यामुळे चालकाने बसमध्ये बसलेल्या सर्व ६ प्रवाशांनाही खाली उतरविले आणि बस डेपोवर उपलब्ध मेकॅनिकला मदतीसाठी फोन केला. मेकॅनिकच्या सूचनेनुसार चालकाने गाडी बंद करून पुन्हा सुरू केली. त्याचवेळी इंजिनला आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आहे.

आग लागलेली पाहून चालक आणि वाहकाने तत्काळ बसमध्ये उपलब्ध फायरचे सिलिंडर वापरून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केला. मात्र, आग नियंत्रणात येण्याऐवजी ती भडकतच गेली. या आगीमुळे बसचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला. माहिती मिळताच स्मार्ट सिटीबस विभागाचे मुख्य व्यवस्थापक राम पवनीकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन बसची पाहणी केली.

टाटा कंपनीचे पथक करणार पाहणी

स्मार्ट सिटी बसचे मुख्य व्यवस्थापक श्री. पवनीकर यांनी सांगितले की, या बसची टाटा कंपनीकडून एक पथक येऊन पाहणी करेल. आगीचे नेमके कारण काय होते, ते या तपासणीतून कळू शकेल. या बसची नियमित सर्व्हिसिंग मागच्याच महिन्यात टाटाच्या सर्विस सेंटरमध्ये झाली होती. आता कंपनीकडून तपासणी झाल्यानंतर आगीचे कारण स्पष्ट होईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

विरोधी पक्षनेते दानवे यांनी केली पाहणी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी भेट देऊन या आगीच्या घटनेची माहिती घेतली. यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून बसला अचानक आग का लागली याची माहिती घेण्याची सूचना केली.

अग्निशमन दल येईपर्यंत आग वाढली

आग आटोक्यात येत नसल्याने चिकलठाणा अग्निशमन दलाशी संपर्क करून घटनेची माहिती देण्यात आली. चिकलठाणा अग्निशमन दलप्रमुख अशोक खांडेकर यांनी जवानांसह घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणायचा प्रयत्न केला.

दरम्यान आग जास्तच भडकल्याने शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलालाही बोलावण्यात आले. चिकलठाणा अग्निशमन आणि शेंद्रा एमआयडीसी दल या दोन्ही बंबाच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. चिकलठाणा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या वतीने या घटनेचा तपास सुरू आहे.

तांत्रिक कारण

तब्बल ३६ कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटीअंतर्गत शहरवासीयांच्या सेवेसाठी शंभर सिटी बस खरेदी केलेल्या आहेत. यापैकी सिटीबसने भर रस्त्यावर वरूड फाट्याजवळ दुपारी अचानक पेट घेतला. तांत्रिक कारणामुळे बसने पेट घेतल्याचे स्पष्टीकरण स्मार्ट सिटीबस व्यवस्थापनाने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com