esakal | वादळी वारे, बेमोसमी पाऊस अन् गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

बोलून बातमी शोधा

वादळी वारे, बेमोसमी पाऊस अन् गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
वादळी वारे, बेमोसमी पाऊस अन् गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : वादळी वाऱ्यासह झालेल्या बेमोसमी पावसामुळे बुधवारी (ता.२८) चार वाजेच्या सुमारास उन्हाच्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र वादळी वारे, बेमोसमी पाऊस अन् गारपिटीमुळे मुरमा, कोळीबोडखा, सानपवाडी (ता.पैठण) परिसरात या पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान होऊन मोठी हानी झाली. या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा दिला असला तरी गारपिट, वादळी वारे व मेघगर्जनेसह झालेल्या या पावसाने सुमारे दहा मिनिटांत परिसराला चांगलेच झोडपून काढले.

शेतकऱ्यांनी जनावरांसाठी लावलेल्या कडब्याच्या गंजी झाकलेल्या नसल्याने कडबा भिजून मोठे नुकसान झाले. काही शेतकरी खरीप पेरणीपूर्वी मशागतीत व्यस्त असताना त्यांना अचानक कामे सोडावी लागली तर कामावर गेलेल्या महिलाची तारांबळ उडाली. ऊन देण्यासाठी अंगणात वाळू घातलेले ज्वारी, गहू व बाजरी गोळा करताना अचानक आलेल्या पावसाने लोकांची भंबेरी उडाली.

हेही वाचा: पैठण तालुक्यातील चितेगाव, पांगरा, जांभळीत जोरदार पाऊस; पिकांचे नुकसान

जोरदार वादळी वाऱ्याने शेतातील उन्हाळी बाजरी, मका आडवी झाली, तर अनेक घरावरील पत्रे उडून गेली. एकंदरीत या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळच उडाली. दहा मिनिटे चाललेल्या या जोमदार पाऊस व गारामुळे मोसंबी, डाळिंब व पपईची नुकसान झाली. तर आंब्याच्या झाडाखाली कैऱ्याचा खच पडला. बहुतांश शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कांदा बियाण्याचा पिकालाही फटका बसला. काही ठिकाणी काढणी अभावी उभा असेलेला गहू भिजला. दरम्यान वादळी वाऱ्यांसह बेमोसमी पाऊस शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. दरम्यान परिसरात वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने एकच थैमान माजविले. गार पडण्यास सुरुवात होताच अनेकानी गारीचे फटके सहन करीत गारा वेचायला सुरुवात केली. या पावसामुळे कांद्या बियाण्याचा पिकालाही फटका बसला. काढणीसाठी शिल्लक राहिलेला गहू भिजला आहे, तर मोसंबी, आंबा, डाळिंब अशा फळपिकांची मोठ्या प्रमाणात गळ होऊन फळास छिद्रे पडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात एकीकडे कोरोनाचा कहर वाढत असताना आता अस्मानी संकट उभे राहिले आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यात वादळीवाऱ्यासह बेमोसमी गाराचा पाऊस सुरू झाला आहे. यात मोसंबी, आंबा अशा फळपिकांचे आतोनात नुकसान होऊन शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने तातडीने नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी दिनकर मापारी, बंडू चिडे, बंडू गायकवाड, सरपंच फौजिया सय्यद, अनिस पटेल, इरफान मेजर आदींनी केली.