esakal | कोरोना रुग्णांची लपवाछपवी, महापालिकेचे फलक लागेना; शेजाऱ्यांचा वाढला धोका
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना

कोरोना रुग्णांची लपवाछपवी, महापालिकेचे फलक लागेना; शेजाऱ्यांचा वाढला धोका

sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद : कोरोना संसर्गाची दुसरी लाट थोपविण्यासाठी महापालिकेने कोरोनाबाधितांच्या घरांवर फलक लावण्याचा निर्णय घेतला होता. पण शहरात दररोज सरासरी एक हजार रुग्ण आढळून येत असल्याने महापालिकेची यंत्रणा तोकडी पडली असून, फलक लावण्याच्या नावाने बोंबाबोंब सुरू आहे. तर दुसरीकडे अनेक जण घरातील कोणी कोरोना पॉझिटिव्ह आल्यास लपवाछपवी करत आहेत. त्यामुळे शेजाऱ्यांचा धोका वाढला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील शेकडो कुटुंब कोरोनाबाधित होत आहेत. घरातील एकाला संसर्ग झाल्यास अख्खे कुटुंब बाधित होत आहे. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या संपर्कातील नागरिकांना देखील संसर्ग होण्याची भीती असल्याने महापालिकेने ज्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळला त्या घरावर ‘इथे कोरोना रुग्ण आहे’ असे फलक लावण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी घेतला होता. जेणेकरून शेजारी सावध होतील. पण गेल्या दोन महिन्यात मोजक्याच घरांवर स्टिकर लावण्यात आले आहेत. त्यामुळे संसर्ग वाढत आहे.

त्यात अनेकजण घरातील एखादा सदस्य पॉझिटिव्ह आल्यास शेजाऱ्यापासून लपवाछपवी करत आहेत. त्यामुळे शेजारी नेहमीप्रमाणे कोरोनाबाधितांच्या घरात ये-जा करत असल्याचे चित्र आहे. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत अशी लपवाछपवी केली जात आहे. ज्यांना कोरोनाचे तीव्र लक्षणे नाहीत त्यांना आठ दिवसात घरी सोडले जाते. पण पुढील आठ दिवस होम क्वारंटाईन होण्याच्या सूचना केल्या जातात पण लहान मुलांच्या बाबतीत या सूचना पाळल्या जात नसल्यामुळे ही मुले इतर मुलांसोबत खेळून संसर्ग पसरवत आहेत.

कंन्टेनमेंट झोनमध्ये वावर सुरूच : जास्त रुग्ण असलेले शहरातील २६ भाग कंन्टेनमेंट झोन आठ दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले आहेत. या भागात इतर भागातील नागरिकांचा वावर बंद करा, अशा सूचना केंद्रीय पथकाने दोनवेळा केल्या आहेत. पण महापालिका फक्त हा भाग कंन्टेनमेंट झोन आहे, असे फलक लावून प्रशासन मोकळे झाले आहे.

पूर्वी काय, आता काय?

- पूर्वी कोरोनाचे रुग्ण आढळून आलेला संपूर्ण भाग सील करून पत्रे ठोकून रस्ते बंद केले जात होते. तो भाग कंन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केल्यानंतर नागरिकांना घराबाहेरही पडता येत नव्हते. पण आता तुरळक घरात रुग्ण आढळून येत असल्याचे कारण देऊन पत्रे ठोकणे बंद करण्यात आले.

- गतवर्षी सुमारे साडेपाचशे भागात २८ दिवसांचे निर्बंध लावण्यात आले होते. पण यावेळी कंन्टेनमेंट झोन जाहीर होऊन आठ दिवस उलटले तरी त्या भागात सर्वसामान्य व्यवहार सुरू आहेत.

- संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यासाठी टास्कफोर्सची स्थापना करण्यात आली होती. यावेळी फक्त कोरोना चाचणी केंद्रावर आलेल्या नागरिकांचीच चाचणी केली जात आहे.