
औरंगाबाद : अनधिकृत नळधारकांवर लवकरच गुन्हे दाखल होणार
औरंगाबाद : महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी गुरुवारी अमृत प्लाझा (हमालवाडा)व सिल्क मिल कॉलनी भागात सुमारे २३ अनधिकृत नळ कनेक्शन शोधून काढले. अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
महापालिका क्षेत्रात उद्भवलेली पाणीबाणी आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महापालिकेत सर्व विभाग प्रमुखांना पाणी पुरवठा बाबत विविध जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. प्रत्येक झोनसाठी एक याप्रमाणे नऊ पालक अधिकारी नेमण्यात आले आहेत. याशिवाय, श्री. वाहुळे यांना जलवाहिनीवरील नळांची तपासणी करून अनधिकृत नळ कनेक्शन शोधणे, असे नळ खंडित करून पाणी चोरी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करणे, अशी अनधिकृत नळ जोडणी करणारे प्लंबर यांच्यावर गुन्हे दाखल करणे, नवीन अनधिकृत नळ जोडण्या होणार नाहीत याची दक्षता घेणे व नियोजन करणे ही जबाबदारी दिली आहे.
यानुसार श्री. वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता अशोक पदमे, कनिष्ठ अभियंता एन. व्ही. वीर, रोहित इंगळे, अमित पंडागळे यांच्या विशेष पथकाने गुरुवारी २३ अनधिकृत नळ कनेक्शन शोधून काढले. हे अनधिकृत कनेक्शन खंडित करून असे नळ कनेक्शन घेणारे नागरिक आणि ते जोडून देणारे प्लंबर यांच्या वर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे श्री. पदमे यांनी सांगितले.
Web Title: Aurangabad Unauthorized Pipe Holders Against Crime Registered
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..