esakal | ग्रामीण भागातच मिळणार कोरोना रुग्णांना उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागातच मिळणार कोरोना रुग्णांना उपचार

ग्रामीण भागातच मिळणार कोरोना रुग्णांना उपचार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : दिवसेंदिवस ग्रामीण भागात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या रुग्णांवर उपचाराच्या अनुषंगाने तसेच शहरातील घाटी रुग्णालय, मिनी घाटी (जिल्हा सामान्य रुग्णालय) व खासगी रुग्णालयांचा भार कमी करण्याच्या हेतूने जिल्ह्यातील १६ खासगी रुग्णालयांना डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यामुळे खेड्या-पाड्यातील कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. शहर व जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील रुग्णदेखील मोठया संख्येने शहराकडे धाव घेतात.

याचा ताण स्थानिक आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. यावर उपाययोजनेच्या दृष्टीने सोमवारी (ता.१२) जिल्हा प्रशासनाने बैठक घेतली. यात, ग्रामीण भागातील कोव्हीड उपचार करू शकणाऱ्या एकूण १६ सक्षम खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. हे करत असताना रुग्णालयातील उपचार यंत्रणा, बेड्सची संख्या, आयसोलेशन बेड्स, ऑक्सीजन बेड्स, व्हेन्टिलेटर्स, आयसीटीयू बेड्स आदी अटी घालण्यात आल्या आहेत.

कोरोना रुग्णांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार या डीसीएचसीमध्ये उपचार मिळणार आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त पथकाकडून या सर्व डिसीएचसीची बारकाईने तपासणी व मूल्यमापन केले जाणार आहे. यात दोषी आढळ्यास डिसीएचसीची मान्यता काढून घेण्याची तरतूद ठेवण्यात आली आहे. या सर्व डीसीएचसी रुग्णालयांना अद्यावत दैनंदिन अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करणे बांधकारक राहील.

या रुग्णालयांना मिळाली मान्यता : डीसीएचसी म्हणून मान्यता मिळालेल्या जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये, घृष्णेश्वर मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल (बजाजनगर), ममता मेमोरियल मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल (एमआयडीसी वाळूज), लिलासन हॉस्पिटल (बजाजनगर), माणिक हॉस्पिटल (वाळूज), शिवना हॉस्पिटल (लासूर स्टेशन), श्री गजानन अँड क्रिटिकल केअर युनिट (महाराणा प्रताप चौक, बजाजनगर, वाळूज), गजानन हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर (कामगार कल्याण भवन, बजाजनगर), तिरुपती हॉस्पिटल आयसीटीयू अँड ट्रामा सेंटर (बजाजनगर), अष्टविनायक हॉस्पिटल (बजाजनगर), गजानन हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर (बिडकीन), श्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आयसीयू (फुलंब्री), संजीवनी मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल (गंगापूर), आदर्श सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र (नाचनवेल, ता. कन्नड), इमिकेअर मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल (बजाजनगर), निओ सिटी हॉस्पिटल (फाईव्ह स्टार शेंद्रा), निमाई हॉस्पिटल (बजाजनगर).