
औरंगाबाद : तरुणाला मारहाणप्रकरणी आयुक्तांची चौकशी करा
औरंगाबाद : पाण्याबाबत निवेदन घेऊन महापालिकेत गेलेल्या एका तरुणाला मारहाण करीत खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी रविवारी राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विनोद पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सदरील आयुक्तांवर कारवाई करण्याच्या मागणीचे पत्र दिले. निवेदनात म्हटले आहे की, शहरात १५-१५ दिवसांनंतरही पाणीपुरवठा होत नाही. याबाबत निवेदन देऊन सामाजिक कार्यकर्ते राहुल इंगळे हे महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना भेटण्यासाठी गेले असता दिलेल्या निवेदनाची समाधान करण्याऐवजी रजाकार पद्धतीने धक्काबुक्की करत व सुरक्षारक्षकांना सांगून इंगळे यांना मारहाण करण्यात आली. ही बाब अतिशय धक्कादायक असून एवढ्यावरच न थांबता खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. घटनेची दुर्दैवी छायाचित्रही शिंदे यांना दाखविण्यात आले. पांडेय यांची तत्काळ उचलबांगडी करावी व पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी पोलिसांकडून त्यांच्याकडून चौकशी करावीत. त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे. दाखल झालेला गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा संबंधितांना सूचना करावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.