
औरंगाबाद :आठ दिवसांत वाढणार १० एमएलडी पाणी!
औरंगाबाद : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आगामी आठ दिवसांत म्हणजेच २० मेपर्यंत १० ते १२ एमएलडी वाढीव पाणी मिळेल, असा दावा गुरुवारी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर करण्यात आला. येणाऱ्या पाण्याचे मोजमाप ठेवण्यासाठी फ्लो मीटरची खरेदी केली जाणार आहे.
महापालिकेचे प्रशासक आस्तिकककुमार पांडेय यांनी स्मार्ट सिटी अभियानाच्या कार्यालयात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला. त्यानंतर प्रशासनातर्फे आगामी काळात १० ते १२ एमएलडी पाणी वाढेल, असा दावा करण्यात आला. हर्सूल तलावातील पाणी उपसा वाढविण्यासोबतच सिडको एन-७ व एन-५ टाक्यावरचे टँकर पॉइंट बंद केले आहेत. हे टॅंकर आता एमआयडीसीच्या सिडको एन-१ येथील टाकीवर भरले जात आहेत. त्यामुळे दोन एमएलडी वाचले आहे.
परिणामी एन-१, एन-३, एन-४, एन-५, एन-६, एन-७ आणि एन-८ या भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. अकोला पॅटर्नप्रमाणे भूजल पातळी वाढविण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, महाराष्ट्र शासनाच्या मदतीने प्रकल्प अहवाल करण्याची व शेवटची टाकी पहिल्यांदा भरून पाणी पुरवठा करणे शक्य आहे का? याचा अहवाल देण्याची जबाबदारी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्याकडे देण्यात आली.
बैठकीला शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त संतोष टेंगळे, अपर्णा थेटे, हेमंत कोल्हे, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अजय सिंग, सेवानिवृत्त अभियंता एस. ए. खान, कार्यकारी अभियंता डी. के. पंडित, के. पी. धांडे, उपअभियंता अशोक पद्मे, अरुण मोरे, मनोज बाविस्कर, स्मार्ट सिटीचे सिद्धार्थ बनसोड, फैज अली उपस्थित होते.
Web Title: Aurangabad Water Scarcity 10 Mld Will Get Increased Water
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..