
औरंगाबाद शहरात आषाढीपासून चार दिवसाआड पाणी
औरंगाबाद - आषाढी एकादशीपासून शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आता १० जुलैपासून पाच दिवसाआडऐवजी चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
शहरात गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई आहे. अनेक भागात आठ-नऊ दिवसानंतर पाणी मिळत असल्याने नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शहरात येत जलआक्रोश मोर्चा काढल्यानंतर पाण्यावरून राजकारण पेटले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत तातडीने उपाययोजना करण्याचे प्रशासनाला आदेश दिले होते. पाणी पुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यावर सोपविण्यात आली होती.
दरम्यान महापालिकेचे प्रशासक श्री. पांडेय यांनी पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी ४२ कलमी उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कामे सुरू होती. सोमवारी प्रशासक श्री. पांडेय यांच्या उपस्थितीत शहरातील पाणी पुरवठ्याची आढावा बैठक घेण्यात आली. त्यात शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याबद्दल ४२ उपाययोजनांवर चर्चा झाली. त्यानंतर श्री. पांडेय यांनी सांगितले की, प्रथम सात दिवसानंतर, नंतर पाच दिवसाआड पाणी पुरवठा केला. सध्या हर्सूलच्या पाण्यात वाढ झाली आहे. महापालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे पाणी पुरवठा सुरळीत होत आहे. त्यामुळे रविवारपासून आषाढी एकादशीपासून शहरात चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Web Title: Aurangabad Water Scarcity Water Supply Four Day Ashadhi Ekadashi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..