
औरंगाबाद : शहराच्या पाणी पुरवठ्यात वारंवार व्यत्यय येत आहे. गेल्या आठवड्यात दोनवेळा तांत्रिक बिघाड झाला. आता एका उंदराने शहराचा सुमारे ११ तास पाणीपुरवठा बंद केल्याचा प्रकार समोर आला आहे. जायकवाडीत पंपगृहातील ‘मेनहोल’मध्ये उंदीर शिरल्यामुळे स्पार्किंग होऊन सोमवारी (ता. १९) पहाटे पंपगृहाचा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे नवीन व जुन्या दोन्ही योजनांचा बंद पडलेला पाणी उपसा सुरू होण्यासाठी ११ तास लागले. परिणामी, पाणीपुरवठा आगामी तीन ते चार दिवस विस्कळित होण्याची शक्यता पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ७०० मिलिमिटर व्यासाची जलवाहिनी बिडकीनजवळील फरशी फाटा येथे फुटली. त्यानंतर दुरुस्तीसाठी तब्बल ३० तासांचा अवधी लागला. त्यानंतर काही तासातच फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात जुन्या योजनेवरील पंपातच तांत्रिक बिघाड झाला. या अडचणींमुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळित झाला आहे. तो पूर्वपदावर आणण्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे प्रयत्न सुरू असताना सोमवारी जायकवाडी येथील पंपगृहात बिघाड झाला.
पहाटे दोन वाजून पाच मिनिटांनी जुन्या व नवीन योजनेवरील वीजपुरवठा अचानक बंद झाला. त्यामुळे दोन्ही पाणी पुरवठा योजनांचा पाणी उपसा थांबला. कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता, पंपगृहाच्या मेन पॅनलमध्ये चार नंबरच्या पंपावरील फिडरमध्ये उंदीर घुसल्यामुळे स्पार्किंग झाल्याचे निदर्शनास आले. या स्पार्किंगमुळे फॉल्ट झाला व सबस्टेशनवरील ट्रान्सफॉर्मर खराब झाले. त्यामुळे बायपासद्वारे वीज पुरवठा घेऊन जुनी योजना पहाटे चार वाजून २० मिनिटांनी सुरू करण्यात आली. या काळात ५६ एमएलडी क्षमतेची जुनी योजना देखील दोन तास १५ मिनिटे बंद होती. दोन्ही योजना बंद असल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला.
आठवडाभरात तिसऱ्यांदा बिघाड
शहराच्या पाणी पुरवठ्यात आठवडाभरात तिसऱ्यांदा बिघाड झाला आहे. सोमवारच्या बिघाडामुळे १०० एमएलडीची पाणीपुरवठा योजना ११ तास पाच मिनिटे बंद होती. या काळात शहरातील पाण्याच्या टाक्यात पाणी येऊ शकले नाही. सोमवारी दुपारी एक वाजेनंतर जायकवाडी पंपगृहातून पाणी उपसा सुरू झाल्यानंतर शहरात पूर्ण क्षमतेने पाणी येण्यास सुरवात झाली, असे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.