
औरंगाबाद : 'पाणीपुरवठ्यावर' पुन्हा संकट
औरंगाबाद : शहराचा पाणीपुरवठा विविध कारणांनी वारंवार विस्कळित होत आहे. त्यात शनिवारी फारोळा येथे अत्यावश्यक दुरुस्तीसाठी दोन तासांचा शटडाऊन घेण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीने घेतला आहे. त्यामुळे या काळात दोन्ही पाणीपुरवठा योजना बंद राहणार असून, शहरातील पाणी वितरणावर परिणाम होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
उन्हाळा सुरू झाल्यापासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. काही भागाला आठ-नऊ दिवसानंतर तर काही ठिकाणी चार-पाच दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत. दरम्यान प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी संपूर्ण शहराला समान म्हणजेच चार दिवसाआड पाणी देण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. निवृत्त कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्याकडे पाणीपुरवठ्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
पण गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहेत. त्यात भर म्हणून शनिवारी वीज वितरण कंपनी दोन तास शटडाउन घेणार आहे. फारोळा येथील महापालिकेच्या नवीन व जुन्या पंपगृहाला चितेगाव येथील २२० केव्ही उपक्रेंद्रातून एक्स्प्रेस फिडरद्वारे वीजपुरवठा केला जातो. या उपकेंद्रात रोहित्राला जोडणी करण्यात आलेल्या करंट ट्रान्स्फॉर्मरमधून (सीटी) ऑइल लिकेज होत आहे. त्यामुळे करंट व व्होल्टेजमध्ये अनियमितता येऊन मोठा बिघाड होण्याचा धोका आहे.
त्यामुळे शनिवारी सकाळी १२ ते दुपारी दोन या वेळेत खंडकाळ घेण्यात येईल, असे वीज कंपनीने महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे या काळात ५६ एमएलडी व १०० या दोन्ही योजनेचा पाणी उपसा बंद राहणार आहे. परिणामी शनिवारी ज्या भागात पाणीपुरवठा असेल तेथील वेळापत्रक कोलमडणार आहे. नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
पाणीपुरवठा अचानक एक दिवसाने उशिरा
औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्र सुरळीत करण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अधिकारी मनमानी पद्धतीने निर्णय घेत असल्याचे समोर आले आहे. ज्युब्लीपार्क पाण्याच्या टाकीवरील पाणीपुरवठा एक दिवस अचानक पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे तब्बल दीड लाखांहून अधिक नागरिकांना पाणी टंचाईचा फटका बसला आहे.
ज्युब्लीपार्क पाण्याच्या टाकीवरून शुक्रवारी पहाटे भडकलगेट, नूर कॉलनी, टाऊन हॉल सह इतर भागांचा पाणी पुरवठा नियोजित होता. त्यानुसार नागरिक वाट पाहत होते. पण सकाळी सात वाजेपर्यंत पाणी आले नाही. त्यामुळे काही नागरिकांनी टाकीवर धाव घेत विचारणा केली, त्यावेळी एक दिवसाने पाणीपुरवठा पुढे ढकलण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.वरिष्ठांच्या सांगण्यावरून हे केले, असेही सांगण्यात आले. गुरुवारी ज्या वसाहतींना पाणी देण्यात येणार होते, त्यांना शुक्रवारी देण्यात आले. या प्रकारामुळे नागरिक संतप्त आहेत.
ज्युबली पार्क टाकीवरून होणारा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला यासंदर्भात मला माहिती नाही. कनिष्ठ अधिकाऱ्यांना विचारून माहिती देतो.
-हेमंत कोल्हे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख
काही वसाहतींना आठ-नऊ दिवसानंतर पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे त्या भागाला दिलासा देण्यासाठी पाणीपुरवठा एक दिवसाने कमी करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे काही वसाहतींचे पाणी एक दिवस पुढे ढकलले. पण पूर्वसूचना नागरिकांना देण्यात आली नाही.
-अरुण मोरे, कनिष्ठ अभियंता
Web Title: Aurangabad Water Supply Scarcity Power Company Shut Down Two Hours Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..