
औरंगाबाद : दारू विक्रीच्या विरोधात रणरागिणी मैदानात
सिल्लोड : गावामध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या दारूविक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून तरुण मुले व्यसनाच्या आहारी जाऊ लागल्यामुळे वडोदचाथा (ता.सिल्लोड) येथील रणरागिणी आक्रमक झाल्या असून त्वरित मागणीची दखल घेऊन येथील महिलांनी अवैधरीत्या सुरू असलेली दारू विक्री बंद करण्याची मागणी उपविभागीय पोलिस अधिकारी, सिल्लोड ग्रामीण पोलिस व उपविभागीय अधिकाऱ्यांना सोमवारी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वडोदचाथा येथील काही नागरिक बेकायदेशीररीत्या देशी दारूची दोन वर्षांपासून सर्रासपणे विक्री करतात. याची माहिती गावकऱ्यांनी वेळोवेळी तोंडी व लेखीसुद्धा पोलिसांना दिली. परंतु अद्यापपर्यंत दारूची विक्री बंद झाली नाही. दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. तर तरुण मुले व्यसनाच्या अधीन गेली आहे. दारूमुळे दररोज कुटुंबामध्ये भांडणे होत आहे.
रोजच्या भांडणामुळे महिलांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अवैधरीत्या सुरू असलेला दारू विक्रीचा व्यवसाय बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथील रणरागिणींनी दिला आहे. पोलिस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर महिलांसह गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहे. आता महिलांच्या मागणीवर पोलिस प्रशासन आता काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.