
औरंगाबाद : इच्छुकांच्या नजरा आता आरक्षणाकडे..!
औरंगाबाद : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट व गणांच्या प्रारूप रचना अंतिम करण्याचे काम सुरू आहे. येत्या २७ तारखेला अंतिम प्रारूपरचना जिल्हाधिकारी प्रसिद्ध करणार आहेत. त्यानंतर आरक्षणे काढली जातील. त्यामुळे आता जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुकांच्या नजरा आरक्षणाकडे लागल्या आहेत. यावेळेस प्रथमच ओबीसी आरक्षणाविना निवडणुका होणार असल्याने खुल्या गटातील इच्छुकांची गर्दी राहणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सध्या नव्याने करण्यात आलेल्या प्रारूप रचनेवरील हरकती व आक्षेपांवर विभागीय आयुक्तांकडे सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. यावर निर्णय दिल्यानंतर २७ जूनला जिल्हाधिकारी अंतिम प्रारूप रचना जाहीर करणार आहेत. त्यानंतर लगेचच गट, गणांची आरक्षणे काढली जाणार आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेसाठी ७० गट व १४० गण झाले आहेत. यात अनेकांचे गटच रद्द झाले असून दुसऱ्या गावाच्या नावाने गटाची पुनर्रचना झाली आहे. त्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे. पण, खरी अडचण आरक्षणानंतरच समजणार आहे.
खुल्या प्रवर्गातील जास्त जागा
महिना अखेरीस आरक्षण सोडती होणार असल्याने सर्वांच्या नजरा त्याकडे लागल्या आहेत. यावेळेस ओबीसी आरक्षण वगळता खुल्या महिला, एसटी. एसटी व महिला आरक्षण काढले जाणार आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील इच्छुकांना जास्त जागा वाट्याला येणार आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील इच्छुकांच्या नजरा आरक्षणावर आहेत.
आरक्षण सोडतीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र
आपला गट आरक्षित झाला तर गणातून निवडून येऊन सभापती होण्याची काहींनी तयारी केली आहे. तर काही जणांनी महिला आरक्षण पडल्यास आपल्या घरातील महिलांना संधी देण्याची तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे गट, गणांच्या आरक्षण सोडतीनंतरच जिल्ह्यातील निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
बदललेल्या रचनेचा फायदा कुणाला?
बदललेल्या रचनेत जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी सोयगाव व खुलताबाद या दोन तालुक्यांतील गट, गणांची रचना जैसे-थे राहिली आहे. पण, उर्वरित सात तालुक्यांतील गट, गणांच्या रचनेत अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. सर्वाधिक बदल सिल्लोड, औरंगाबाद, फुलंब्री, पैठण, वैजापूर, कन्नड, गंगापूर तालुक्यांत झाले आहेत. परिणामी, बदललेल्या रचनेचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला, हे आरक्षणानंतरच स्पष्ट होणार आहे.
Web Title: Aurangabad Zilla Parishad Panchayat Samiti Election New Ward Structure 27 June
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..