बँक खाते गोठवण्याच्या प्रकरणांवर न्यायालयाचा अंकुश

बँक खाते गोठवण्याच्या प्रकरणांवर न्यायालयाचा अंकुश
Published on: 
((((सायबर अलर्ट)))) --- ९८० रुपयांचा संशय आणि तब्बल अडीच कोटींचे बँक खाते गोठवले तपासाच्या नावाखालील मनमानीला उच्च न्यायालयाची चपराक मध्य प्रदेशातील नर्मदापूरम (होशंगाबाद) येथील एक मद्याचे व्यापारी. सुमारे सात दारू दुकानांचा परवाना त्यांच्याकडे होता. सर्व दुकानांचे आर्थिक व्यवहार ते एकाच बँक खात्यावर करत. या खात्यावर दोन कोटी ५१ लाख ७२ हजार रुपये ५७ पैसे इतकी रोकड होती. कुणीतरी त्यांच्या खात्यावर ९८० रुपयांची रक्कम संशयास्पदरीत्या जमा केली. सायबर क्राइमच्या एका स्वतंत्र तक्रारीच्या तपासादरम्यान ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. एप्रिल २०२६ मध्ये अचानक बँकेकडून या खात्यावरील सर्व व्यवहार गोठविण्यात आले. खातेदाराने बँकेकडे लेखी विचारणा केली असता, पोलिसांकडून प्राप्त नोटिसीआधारे आपले खाते गोठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावर खातेदाराने बँकेस एक निवेदन दिले. ज्या रकमेच्या व्यवहाराबद्दल आपल्याला संशय आहे. केवळ तेवढी रक्कम (या प्रकरणात रु. ९८०) हवे तर बाजूला काढून ठेवावी व खात्यावरील उर्वरित रकमेचे दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे चालू ठेवण्यास अनुमती द्यावी, अशी विनंती त्यांनी बँकेस केली. बँकेने यावर कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठासमक्ष याचिका सादर केली. आपले खाते गोठवण्यापूर्वी बँकेने आपल्याला कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. आपले म्हणणे मांडण्याची संधी आपल्याला देण्यात आलेली नाही. बँकेच्या एकतर्फी कारवाईमुळे आपल्या व्यवसायावर मोठे संकट कोसळले, बँकेच्या मनमानी कारभारामुळे समानतेचा अधिकार (कलम १४), व्यवसाय स्वातंत्र्य (कलम १९ (१) (जी)), मालमत्तेचा अधिकार (कलम ३००-ए) या घटनादत्त अधिकारांचा भंग होतो आहे, असा युक्तिवाद न्यायालयासमोर करण्यात आला. याउलट रकमेचे मूल्य अल्प आहे एवढे एकच कारण खाते खुले करण्यास पुरेसे नाही, असे शासनाच्या वतीने सांगण्यात आले. न्यायालयाने उभय पक्षांचे म्हणणे ऐकून काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या. ज्या रकमेबद्दल तपास यंत्रणेला संशय असेल, शक्यतो केवळ तेवढ्याच रकमेस गोठवले जावे. अशावेळी खातेदारास तपास यंत्रणेकडे पाठवून बँकेने आपली जबाबदारी झटकू नये. खातेदारानेही आपली कागदपत्रे बँकेच्या दफ्तरी सादर करून रीतसर आपली तक्रार बँकेकडे सादर करावी, असे न्यायालय म्हणाले. दैनंदिनपणे सायबर क्राइमच्या छायेत वावरणाऱ्या निरपराध सामान्य नागरिकास दिलासा देणारा हा निकाल होय. - ॲड. चैतन्य धारूरकर ९३२५२१३७५९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com