esakal | सख्खा भाऊच निघाला पक्का वैरी, बहिणीचा केला क्रूरतेने खून

बोलून बातमी शोधा

null
सख्खा भाऊच निघाला पक्का वैरी, बहिणीचा केला क्रूरतेने खून
sakal_logo
By
रामदास साबळे

केज (जि.बीड) : गुढी पाडव्यानिमित्त आईला भेटायला आलेल्या बहिणीचा भावाने मित्राच्या मदतीने खून केल्याची घटना मंगळवारी (ता.२०) बोरगाव येथे पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी भावासह त्याच्या मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहिणीच्या खूनाच्या घटनेने तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील बोरगाव येथे आईला गुढीपाडव्याच्या सणानिमित्त भेटण्यासाठी शीतल लक्ष्मण चौधरी (वय २८) ही आपल्या छोट्या मुलीला घेऊन पुण्याहून आली होती.

मात्र याच दरम्यान मंगळवारी‌ पहाटे तिचा भाऊ दिनकर उर्फ दिनू गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर (दोघे रा. बोरगाव) यांनी अज्ञात कारणावरून बहिणीच्या डोक्यात हत्याराने वार करून खून केला. या प्रकरणी मृत महिलेचा चुलत भाऊ नानासाहेब जालिंदर गव्हाणे याने दिलेल्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात दिनकर गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर वळेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या खूनाच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन करत आहेत. मात्र भावाने बहिणीचा खून नेमका कोणत्या कारणाने केला? हे अद्याप स्पष्ट झालेले नसून खूनाचे नेमके कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.