esakal | जावयाने काढला सासूचा काटा, धारदार शस्त्राचे वार करुन केला खून

बोलून बातमी शोधा

death
जावयाने काढला सासूचा काटा, धारदार शस्त्राचे वार करुन केला खून
sakal_logo
By
रामदास साबळे

केज (जि.बीड) : तालुक्यातील साळेगाव येथे एका महिलेचा केज-कळंब राज्य महामार्गावर मृतदेह आढळून आल्याची घटना रविवार (ता.२५) उघडकीस आली आहे. हा खून कोणी केला ? हे स्पष्ट झाले नव्हते. मात्र काही अंतरावर मृताचा पुतण्या जखमी अवस्थेत आढळून आल्याने त्याने दिलेल्या माहितीवरून अवघ्या काही तासातच घटनेचा उलगडा झाला आहे.  जावयानेच धारदार शस्त्राचे वार करून सासूचा खून केल्याचे सांगण्यात आले आहे.अंबाजोगाई तालुक्यातील घायगुडा पिंपळा येथील‌ सुलोचना माणिक धायगुडे (वय ३५) या आपला पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे हे दोघे दुचाकीवरून साळेगाव येथे रविवारीसकाळी जावई अमोल वैजनाथ इंगळे यांना काही कामानिमित्त भेटण्यासाठी‌ आले होते. जावयास भेटून ते दोघे परत अंबाजोगाईला जात असताना केज-कळंब राज्य रस्त्यावरील एका हॉटेल समोर जावई व सासू यांच्यामध्ये वाद होऊन चांगलीच बाचाबाची झाली.

हेही वाचा: गावकऱ्यांच्या एकोप्यामुळे 'कोरोना'ला रोखले, गावात एकही रुग्ण पाॅझिटिव्ह नाही!

याचवेळी अमोल इंगळे याने भेटण्यासाठी आलेल्या सासू व चुलत मेहुण्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून सुलोचना (सासू) यांच्या चेहऱ्यावर, मानेवर व हातावर धारदार शस्त्राचे वार करून जखमी केल्याने यातच त्यांचा मृत्यू झाला तर पुतण्याही जखमी झाला होता. घटनेनंतर अमोल इंगळे हा दुचाकीवरून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक भास्कर‌ सावंत, सहायक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे यांच्यासह पोलीस कर्मचारी अशोक नामदास, कादरी, अमोल गायकवाड, मंगेश भोले व दिलीप गित्ते यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी घटनास्थळावर मिरची पूड व घड्याळ आढळून आली आहे. तर घटना स्थळालगत जखमी अवस्थेतील अंकुश धायगुडे यास पोलीस वाहन चालक कादरी यांनी पोलीस वाहनातून केज उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी अंकुश धायगुडे यांने पोलीसांना दिलेल्या माहितीवरुन खूनाच्या घटनेचा उलगडा होऊन जावयानेच सासूचा खून केला  असल्याचे पोलीसांनी सांगितले. जखमी अंकुश धायगुडे याने दिलेल्या माहितीवरून अमोल इंगळे यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करित आहेत.