esakal | गावकऱ्यांच्या एकोप्यामुळे 'कोरोना'ला रोखले, गावात एकही रुग्ण पाॅझिटिव्ह नाही!

बोलून बातमी शोधा

Corona
गावकऱ्यांच्या एकोप्यामुळे 'कोरोना'ला रोखले, गावात एकही रुग्ण पाॅझिटिव्ह नाही!
sakal_logo
By
राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : गावातील नैसर्गिक आपत्तीच्या काळातील असलेला एकोप्यावर दीड वर्षापासून धुमाकुळ घालणाऱ्या कोरोना महामारीला हाणमंतवाडी (हाडोळी) (ता. निलंगा) येथील गावकऱ्यांनी वेशीवरच रोखले. कोरोना महामारीच्या काळात तालुक्यातील बहुतांश गावे विळख्यात सापडले असून त्याला अपवाद म्हणून हाणमंतवाडी (हाडोळी) हे गाव ठरले आहे. गावातील ग्रामस्थांच्या एकोप्यामुळेच हे शक्य झाले आहे. दीड हजार लोकसंख्या व तीनशे कुटूंब संख्या असलेल्या या गावात कर्मचारी व सुशिक्षित ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आहेत. गतवर्षी कोरोना रोगाची तीव्रता भयंकर होती.त्यामुळे सर्वचजण याबाबत संवेदनाशील होते. मात्र सध्याच्या कोरोना विषाणूमध्ये बदल झाला असल्याने तरूण वर्गही यापासून सुटत नसलेला दिसत आहे. सध्या ऑक्सिजन मिळत नाही. सरकारी व खासगी दवाखान्यात खाट मिळत नाही. अत्यावश्यक असणारे रेमडेसिविर उपलब्ध होत नाहीत. रूग्णालयात भरती केले की, काही तासात मृत्यू झाल्याचा सांगावा येत आहे. अशा गंभीर परिस्थितीतही शासनाने ठरवून दिलेले नियम पाळण्यास नागरिक तयार नाहीत.

हेही वाचा: स्वातंत्र्य सैनिकाने जिंकला ९५ व्या वर्षी कोरोनाविरोधातील लढा, कोरोनावर मात

मात्र गावातील प्रतिष्ठित मंडळी व ग्रामदैवत श्री. नाथ मंदिराचे पुजारी बैठक घेऊन ही महामारी भयंकर आहे. यापासून वाचायचे व गावाला वाचवायचे असेल तर खबरदारी घेतलीच पाहिजे म्हणून मंदिरात संकल्प केला. बाहेरून येणाऱ्याना शाळेतच क्वारंटाईन करण्यात आले. निगेटिव्ह रिपोर्ट आल्याशिवाय गावात प्रवेशच नाही असा निर्णय ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, तंटामुक्त समिती यांच्या बैठकीत घेण्यात आला. तरूणांना एकत्र करून 'अॕन्टी कोरोना फोर्सची' स्थापना करण्यात आली. शिवाय मास्क, सॕनिटायझरचे वाटप, सोशल डिस्टन्स, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर नाही अथवा बाहेर गावच्या कोणासही गावामध्ये प्रवेश नाही, अशी कडक नियमाची आमलबजावणी गावकऱ्यांनी केली. शिवाय एखाद्या घरी किराणा अथवा मेडिकल हवे असल्यास किराणा साहित्याची चिठ्ठी एका रिक्षावाल्याजवळ दिली जाते. यादीनुसार साहित्य घरपोच केले जाते. गावच्या सरपंच पार्वती खुर्दे, उपसरपंच कलावती मुळे, आशा वर्कर शिवकन्या दाळींबे, तंटामुक्त अध्यक्ष केरनाथ मुळे, ग्रामसेवक दिलीप मुळे, अँन्टी कोरोना फोर्सचे कैलास खुर्दे, समीर शेख व त्यांची तरूण टीम व गावकऱ्यांच्या जेष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाने गावात कोणासही आजार नाही. सर्दी, खोकला, ताप नाही. शिवाय कोरोना सारख्या महाभयंकर रोगापासून हे गाव कोसो दूर आहे. आजपर्यंत गावात एकही पॉझिटिव्ह रूग्ण नसल्यामुळे कोरोना सारख्या महामारीला वेशीवरच ठेवण्याचा आदर्श या गावाने घालून दिला आहे.

हेही वाचा: खळबळजनक घटना! मित्रासोबत झालेल्या वादात तरुणाची चाकूने भोसकून खून

पुजाऱ्याला मान : येथील ग्रामदैवत श्री नाथ देवालयाचे ट्रस्ट असून येथील पुजाऱ्यांचा शब्द अंतिम मानला जातो. गतवर्षी कोरोना संसर्ग काळात निधी म्हणून पीएम फंडासाठी तीन लाख तेहतीस हजार 333 रूपये देणगी दिली आहे.

धार्मिक कार्यक्रम रद्द : गावातील रेशन दुकानदाराकडूनही सोशल डिस्टन्सचे पालन करून रेशनचे वाटप केले जाते. शिवाय वर्षामध्ये नाथ देवालयाचे रामनवमी, हनुमान जयंती यासह तीन मोठे कार्यक्रम असतात. मात्र कोरोना संसर्गामुळे हे कार्यक्रम दोन वर्षापासून रद्द केले आहेत.