esakal | स्वातंत्र्यसैनिकाने जिंकला ९५ व्या वर्षी कोरोनाविरोधातील लढा, कोरोनावर मात

बोलून बातमी शोधा

Beed Latest News  Freedom Fighter Defeated Coronavirus

केळसांगवी येथील पंच्याण्णव वर्षांचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक एकनाथ जानकु घुले यांनी कोरोनाविरोधातील लढा यशस्वीपणे जिंकला आहे.

स्वातंत्र्य सैनिकाने जिंकला ९५ व्या वर्षी कोरोनाविरोधातील लढा, कोरोनावर मात

sakal_logo
By
अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी (जि.बीड) : आष्टी तालुक्यात कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना सकारात्मक गोष्टीही पुढे येत आहेत. तालुक्यातील केळसांगवी येथील पंच्याण्णव वर्षांचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक एकनाथ जानकु घुले यांनी कोरोनाविरोधातील लढा यशस्वीपणे जिंकला आहे. शनिवारी (ता.२३) त्यांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आले.

तालुक्यातील केळसांगवी येथील रहिवासी असलेल्या एकनाथ घुले यांना दोन मुली असून, एक मुलगी गावातच दिलेली आहे. त्यांच्या मुलीला (वय 67 ) कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची चाचणी केली असता त्यात एकनाथ घुले यांचा अहवाल पॅझिटिव्ह आला. ता.१९ एप्रिल रोजी त्यांना आष्टी येथील ट्रामा केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले होते. या दरम्यान उपचाराला प्रतिसाद देत घुले यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. पाच दिवसांच्या उपचारानंतर शनिवारी त्यांना सोडण्यात आले. मुलगी अजून रुग्णालयातच असून, त्यापूर्वीच घुले यांनी कोरोनाला हरविले आहे. यावेळी त्यांचे नातलग बा. म. पवार व शिवसंग्रामचे राजेंद्र म्हस्के आदी उपस्थित होते.

हेही वाचा: जिगरबाज १०५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, खचून न जाता धीराने सामोरे जाण्याचा सल्ला

डगमगू नका, धीर धरा...

दवाखान्यातून घरी सोडताना श्री. घुले यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, कोणतीही बिकट परिस्थिती समोर आली तरी डगमगू नका. मनोधैर्य चांगले राखले तर कोणत्याही संकटावर यशस्वीपणे मात करता येते. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने कोरोना लवकरच हद्दपार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या सेंटरमधील अस्वच्छतेबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली.