esakal | गंभीर रुग्णांची कोरोनाग्रस्तांसोबतच एंट्री, सामान्यांचा जीव धोक्यात
sakal

बोलून बातमी शोधा

गंभीर रुग्णांची कोरोनाग्रस्तांसोबतच एंट्री,सामान्यांचा जीव धोक्यात

गंभीर रुग्णांची कोरोनाग्रस्तांसोबतच एंट्री,सामान्यांचा जीव धोक्यात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बीड : ज्या वेळी कोरोना विषाणू संसर्गाची लागण झाली आणि जिल्ह्यात रुग्ण नव्हते. त्यावेळी कोरोना संशयितांसाठी स्वतंत्र ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) होता. आता कोरोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत असतानाच नेमके याच काळात कोरोना संशयित रुग्ण आणि अपघाती रुग्णांचा वावर एकत्रच आहे. याहून गंभीर म्हणजे कार्डियाक, सर्पदंश, विषबाधा अशा गंभीर रुग्णांची एंट्रीही कोरोनाग्रस्तांसोबतच होणार आहे. उपचाराचे नियोजन करताना स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे व्यवस्थापन ढासळत, तर नाही ना असा प्रश्न पडत आहे.

विशेष म्हणजे अंबाजोगाई तालुक्यात अलीकडच्या काळात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी या तालुक्यातील रुग्णांचा आकडा तीनशे पार होता. असे असताना उपचार करणाऱ्या आणि डॉक्टर तयार करणाऱ्या यंत्रणेला ढासळत्या नियोजनाचे गांभीर्य नाही का? ढिसाळ नियोजनामुळे तर रुग्णांची संख्या वाढत नाही ना असा प्रश्न पडत आहे.

मागच्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाला. त्यानंतर विविध उपाय योजना हाती घेण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील उपचाराची मोठी धुरा जिल्ह्यातील एकमेव वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयावर सोपविण्यात आली. त्यावेळी या ठिकाणी संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र उपचार कक्षासह कोरोनाग्रस्तांसाठी स्वतंत्र कक्ष आणि स्वतंत्र आयसीयूही उभारण्यात आला. दरम्यान, जसे कोरोना रुग्ण वाढत गेले तसतसे अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे नियोजन ढासळत चालल्याचे दिसत आहे.

आता या ठिकाणी कोरोना विषाणू संसर्गबाधितांसाठी पाच स्वतंत्र वॉर्ड उभारण्यात आले आहेत. मात्र, जागा कमी पडत असल्याने येथील ‘ए’ बिल्डिंगमध्ये नव्याने कोरोना रुग्णांसाठी वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे काही दिवस आयसीयू आणि कोरोना संशयितांचे वॉर्डच समोरासमोर होते. त्यामुळे आयसीयूमधील असणाऱ्या हृदयविकार, किडनी विकार, सर्पदंश, विषबाधा झालेल्या रुग्णांची वर्दळ एकाच पॅसेजमधून सुरू होती. यामुळे रोगापेक्षा उपचार यंत्रणाच भयानक म्हणण्याची वेळ होती. आता येथील तळमजल्यावर असलेले आयसीयू जरी वरी हलविले असले, तरी या बिल्डिंगची एंट्री एकाच गेटमधून असल्याने आता अशा गंभीर रुग्णांना या कोरोनाग्रस्तांपासून धोकाच आहे. त्यामुळे उपचार यंत्रणा वाढवितानाच वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन संसर्गाचा धोकाही वाढवीत तर नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे.

एकत्रच उपचार : कोरोना संसर्गाच्या सुरवातीला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संशयितांसाठी स्वतंत्र ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) होती. आता मात्र कॅज्युल्टीमध्येच (अपघात विभाग) संशयित रुग्ण येतात. त्यामुळे इतर अपघाती व या संशयितांचा एकमेकांशी संपर्क मोठ्या प्रमाणावर येतो. असे रुग्ण तीन-तीन तास कॅज्युल्टीमध्येच उपचार घेत असल्याने त्यांच्यापासूनही इतरांना बाधा होण्याचा मोठा धोका आहे. संशयितांसाठी स्वतंत्र ओपीडी करणेही गरजेचे आहे.