भडकलगेट ते लेबर कॉलनी
अतिक्रमणांवर आज हातोडा?
-------
छत्रपती संभाजीनगर, ता. २५ : शहरातील रोशनगेट ते चंपा चौक रस्त्यावर अतिक्रमण हटविल्यानंतर आता भडकलगेट ते लेबर कॉलनी परिसरातील अतिक्रमणांवर महापालिका कारवाई करणार आहे. सोमवारी (ता. २६) ही मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी महापालिकेने संबंधित भागात आधीच भोंगा फिरवून मालमत्ताधारकांना अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन केले होते.
महापालिकेने मागील आठवड्यात १७ ऑक्टोबरला रोशनगेट ते चंपा चौकापर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती. या कारवाईत ४६० मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर दंडात्मक कारवाईचा इशारा देत महापालिकेने दगडी महाल ते कटकट गेट आणि चंपा चौक ते जिन्सी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांकडे मोर्चा वळविला होता. आता भडकलगेट ते लेबर कॉलनीपर्यंत काही मालमत्ताधारकांनी पदपथापर्यंत अतिक्रमणे केली आहेत. या भागात फळविक्रेते मोठ्या प्रमाणात बसत असल्याने नागरिकांना रस्त्यावरून वाहने चालवून खरेदी करावी लागते. परिणामी, वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताचा धोका वाढतो. यापूर्वी महापालिकेने काही ठिकाणी कारवाई केली असली, तरी अतिक्रमणांचा प्रश्न कायम असल्याने सोमवारची ही कारवाई महत्त्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
----
यापूर्वी बंदोबस्ताअभावी फसली कारवाई
या परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी महापालिकेने यापूर्वीही प्रयत्न केले. मात्र, वेळेत पोलिस बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने कारवाईला मर्यादा आल्या. आता सोमवारी कारवाई करण्याचे जाहीर केले आहे. या मोहिमेत रस्ते आणि फुटपाथ मोकळे करण्यावर भर दिला जाईल.