Bharat Jodo Yatra Aurangabad : अडीच तासांच्या प्रतीक्षेनंतर राहुल गांधींनी दाखविला हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi

Bharat Jodo Yatra Aurangabad : अडीच तासांच्या प्रतीक्षेनंतर राहुल गांधींनी दाखविला हात

औरंगाबाद : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी मुकुंदवाडी येथे सोमवारी (ता. २१) सायंकाळी शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते, पण राहुल गांधी कार्यकर्त्यांना वाहनातूनच हात दाखवत निघून गेले. त्यामुळे सुमारे अडीच तास थंडीत ताटकळेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. दरम्यान चिकलठाणा विमानतळावर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

कॉंग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. मात्र गुजरात विधानसभा निवडणुकीमुळे यात्रेला दोन दिवसांचा ब्रेक देण्यात आला आहे. सोमवारी (ता. २१) दुपारी १२.३० वाजता राहुल गांधी यांचे जळगाव जामोद येथून हेलिकॉप्टरने चिकलठाणा औरंगाबाद विमानतळावर आगमन झाले. जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले. विमानतळावरूनच श्री. गांधी सुरतला रवाना झाले. त्यानंतर सूरत व राजकोट येथील सभा आटोपून रात्री ७.३० वाजता पुन्हा त्यांचे चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. राहुल गांधी सोमवारी औरंगाबाद शहरात हॉटेल रामा येथे मुक्कामी आहेत.

मुकुंदवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसूफ लिडर, डॉ. पवन भाऊसाहेब जगताप, माजी नगरसेवक बाळूलाल गुजर, ॲड. सरोज मसलगे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मुकुंदवाडी येथे जमा झाले होते. ७.४५ वाजता राहुल गांधी यांचे मुकुंदवाडी येथे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी हार, पुष्पगुच्छ आणले होते.

पण सुरक्षेच्या कारणावरून राहुल गांधी थांबलेच नाहीत. वाहनातूनच त्यांनी हात दाखवत कार्यकर्त्यांना अभिवादन केले. पण वाहनाची गती एवढी होती की, अनेकांना राहुल गांधी दिसलेही नाहीत. थंडीच्या कडाक्यात अडीच ते तीन तास कार्यकर्ते रस्त्यावर उभे होते पण राहुल गांधी यांचा सत्कार करता न आल्याने त्यांचा हिरमोड झाला. याठिकाणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह सुमारे १०० जणांचा बंदोबस्त लावण्यात आला होता पण गांधी न थांबल्याने बंदोबस्तावरील पोलिसांना हायसे वाटले.

विमानतळावर ३८ तर हॉटेलवर सहा जणांची भेट

राहुल गांधी यांना विमानतळावर शहर व जिल्ह्यातील ३८ जणांनाच भेटता आले. त्यात शहराचे २१ तर जिल्ह्याचे १७ पदाधिकारी होते. त्यानंतर रात्री हॉटेलमध्ये फक्त सहा पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यात जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसूफ लिडर, प्रवक्ते डॉ. पवन डोंगरे, जगन्नाथ काळे, किरण पाटील डोणगावकर, अनिस पटले, कैसर बाबा यांचा समावेश होता.