मनपाला विशेष अनुदान देण्याची
भीम आर्मीची सरकारकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता.४ ः शहर महापालिकेच्या सफाई व कामाठी कर्मचाऱ्यांचे मागील ४ ते ५ महिन्यांचे वेतन थकीत राहिल्याने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची भीषण वेळ ओढवली आहे. मागील २५ दिवसापासून हे कर्मचारी आंदोलन करीत असून त्यामुळे महापालिकेला विशेष अनुदान देण्याची मागणी भीम आर्मीने केली आहे.
याप्रकरणी भीम आर्मीने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा नगर विकास विभाग, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. मनपा कर्मचाऱ्यांना हक्काचे वेतन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या घरातील चूल पेटवणे कठीण झाले असून, वृद्ध माता-पित्यांचे आवश्यक औषधोपचार पूर्णपणे बंद पडले आहेत. शाळा-महाविद्यालयांचे शुल्क भरता न आल्यामुळे शेकडो होतकरू विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्ध्यावर सुटण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रदीर्घ २५ दिवसांच्या उपोषणामुळे आंदोलक कर्मचाऱ्यांची प्रकृती कमालीची खालावली आहे. दुसरीकडे, सलग काम बंद आंदोलनामुळे परभणी शहरातील सार्वजनिक स्वच्छता यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून शहरात आरोग्याची आणीबाणी व कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विशेष आपत्कालीन वेतन अनुदान मंजूर करून मनपाच्या बँक खात्यात वर्ग करावे, नियमित वेतन मिळण्यासाठी शासनाने स्वतंत्र व कायमस्वरूपी अनुदान चक्र निर्धारित करावे,
सुरक्षा, आरोग्य विमा व कायदेशीर सोयी सुविधा पुरवण्यासाठी अतिरिक्त निधीस मंजुरी द्यावी, अशी मागणी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बनसोडे यांनी केली आहे.
-----------