
नाशिकहून पाण्याची ‘नाथसागर’कडे झेप
पैठण - नाशिक जिल्ह्यात होत असलेला पाऊस, गोदावरीला आलेल्या पुरामुळे येथील ‘नाथसागर’ च्या (जायकवाडी प्रकल्प) जलपातळीत मोठी वाढ होत आहे. मंगळवारी ५० हजार क्युसेक पाणी दाखल होत होते. नांदुरा-मधमेश्वर बंधाऱ्यातून ८० हजार क्युसेक पाणी नाथसागराच्या दिशेने झेपावले आहे. ते बुधवारी (ता.१३) दुपारपर्यंत दाखल होईल.
सध्या नाथसागराची पाणीपातळी १५०९.०० फूट असून जिवंत पाणीसाठा ९००.०० दशलक्ष घनमीटर आहे. जलसाठ्याची टक्केवारी ४१ आहे. आज रात्री व उद्या सायंकाळपर्यंत एक लाख क्युसेकपर्यंत पाण्याची आवक होण्याची शक्यता जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली. दरम्यान, नाथसागराच्या वरील भागातील, नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात तब्बल दुपटीने वाढ झाली आहे. पाच-सहा दिवसांपूर्वी या धरणांमध्ये २५ टक्के इतका पाणीसाठा होता. आता तो ७० टक्क्यांवर पोचला आहे. गंगापूर, दारणा, भंडारदरा, निळवंडे, मुळा, काश्यपी, गौतमी, आळंदी, गोदावरी, पालखेड, करंजवण, ओझरखेड, पुणेगाव, दारणा, भावली, मुकणे, वालदेवी, कडवा, चणकापूर, हरणबारी, केळझर टक्के, गिरणा, पुनद या छोट्यामोठ्या धरणांतील साठा ६० टक्के झाला आहे.
जायकवाडी क्षमतेच्या १० टक्के पाणी रवाना
नाशिक : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर, दारणा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यासोबत पावसाचे पाणी जायकवाडी धरणाकडे नांदूर-मधमेश्वर धरणातून रवाना होत आहे. बुधवारी सकाळपर्यंत जायकवाडी धरणाच्या क्षमतेच्या १० टक्क्यांहून अधिक पाणी रवाना होईल. आज सकाळपर्यंत साडेपाच टीएमसीहून अधिक पाणी गोदावरीमधून जायकवाडीकडे निघाले होते. तसेच आणखी साडेसहा टीएमसी पाणी रवाना झाले आहे.
Web Title: Big Increase In Water Level Of Nathsagar Jayakwadi Project Aurangabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..