२५ वर्षांपासूनची युती तुटल्यानंतर आता भाजपचे लक्ष्य महापालिका

जवळपास दोन वर्ष कोरोनाच्या सावटखाली गेली. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांनी कोरोना काळात मदतकार्य करीत तयारी सुरु केली होती
bjp
bjpbjp

औरंगाबाद: गेल्या २५ वर्षांपासून महापालिकेत एकमेकांसोबत असलेले सेना-भाजप हे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून दुरावले. शिवसेना (shivsena) ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेला कोंडीत पकडत भाजप (BJP) शहरात ताकत वाढविण्याचे प्रयत्न करीत आहे. गेल्या दोन वर्षापासून हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन भाजप सेनेवर हल्लाबोल करीत आहे. यासह शहराच्या नामकरणावरुन अनेक आंदोलने करीत शिवसेनेची प्रतिमा डागाळण्याचे कामही भाजपने केले. एवढेच नव्हे, तर कोरोनाच्या काळात आघाडी सरकारसह शिवसेनेविरोधात भाजपने अनेकदा आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. युती तुटल्यानंतर आता भाजपने महापालिकेवर विशेष फोकस केला आहे. कोविडच्या काळातही बूथनिहाय बैठकांसह बूथ भक्कम करण्यावर लक्ष दिले. या तयारीतून महापालिका ताब्यात घेण्याचे भाजपचे मनसुबे दिसून येत आहेत.

जवळपास दोन वर्ष कोरोनाच्या सावटखाली गेली. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांनी कोरोना काळात मदतकार्य करीत तयारी सुरु केली होती. मात्र, महापालिका निवडणूक कोरोनामुळे लांबणीवर पडली. यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. असे असले तरी, भाजपने मात्र आंदोलन,मदत या माध्यमातून ताकत वाढविण्याचे प्रयत्न केले. महापालिकेत सेना-भाजपने एकत्र निवडणुका लढविल्या होत्या. युती असताना भाजपचे २३ नगरसेवक निवडून आले होते. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून तीन्ही पक्ष उतरल्यानंतर काय करावे, याचीही रणनिती भाजपतर्फे ठरविण्यात आली आहे. यासाठी आता शिवसेना वगळता इतर मित्रपक्षांनाही सोबत घेण्याची तयारी भाजपने केली आहे. कोरोनापूर्वी भाजपतर्फे महापालिकेसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. त्यावेळी ११५ वार्डासाठी जवळपास बाराशेहून अधिक अर्ज आले होते. युती तुटल्यापासून भाजपला सर्व जागा लढवता येणार आहेत.

bjp
मराठवाडा वॉटरग्रीडविषयी न्यायालयात जाणार- बबनराव लोणीकर

आंदोलनाने गाजवला कोरोनाचा काळ-
महापालिकेतील युती तुटल्यानंतर पाणी पुरवठा योजना, औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणासाठी सभागृहात भाजपने सेनेची कोंडी केली होती. त्यानंतर कोरोना काळातही आक्रमकपणे वेगवेगळे विषय मांडत सरकार आणि शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे कामही भाजपने केले. मंदिरे खुली करावीत, शेतकऱ्यांचे प्रश्‍न यासह महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांविरोधात भाजपने आक्रमकपणे केलेले आंदोलनही राज्यभर गाजले. एवढेच नव्हे, तर कोरोनाकाळात बुथच्या माध्यमातून मदत कार्य सुरु ठेवले.

भाजपमध्येही अंतर्गत खदखद
राज्यात भाजपचे सरकार असताना औरंगाबादेत तत्कालीन शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची संघटनात्मक बांधणी झाली. एवढेच नव्हे तर शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये आणत सेनेला खिंडार पडते की काय अशी परिस्थिती झाली होती. मात्र, शहराध्यक्ष पदाला मुदतवाढ न मिळाल्याने तनवाणी पुन्हा स्वगृही शिवसेनेत परतले. यानंतर भाजपमध्ये होणारे इनकमिंग आऊटगोईंगमध्ये बदलले. त्यानंतर निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत निष्ठावंतांच्या वाटेवर येणारी प्रमुख पदे नव्या चेहऱ्यांना देण्यात आली. यामुळे निष्ठावंतांमध्ये नाराजी आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजी, खदखद कमी जास्त प्रमाणात चव्हाट्यावर येऊ लागली आहे. त्यामुळे एकसंध नेतृत्वाचा अभाव पक्षात दिसतो आहे. शिवसेनेप्रमाणे भाजपमध्येही गटतट दिसून येत आहेत. ही खदखद अशीच कायम राहिली तर याचा फायदा निश्‍चितच शिवसेनेला होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com