पान ३ अँकर
---
ABD26J81562
राहोली (खु.) : जि.प. शाळेत पुस्तकदान कार्यक्रमाला उपस्थित मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुधीर ठोंबरे व शिक्षक.
---
८७५ शाळांमध्ये लोकसहभागातून ‘पुस्तकदान’
---
वाचनसंस्कृतीला गती ः महिनाभराच्या मोहिमेने समृद्ध झाली शालेय ग्रंथालये
---
हिंगोली, ता. १७ : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ८७५ शाळांमध्ये महिनाभरात भव्य पुस्तकदान उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत पार पडलेल्या या उपक्रमातून शाळांची ग्रंथालये समृद्ध करण्यासह विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात आला.
या मोहिमेचा समारोप करताना १६ ऑक्टोबरला हिंगोली तालुक्यातील राहोली खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विशेष पुस्तकदान कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त लोकसहभागातून पुस्तके जमा केली. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना विविध ज्ञानशाखांची ओळख व्हावी आणि ग्रामीण भागात वाचनसंस्कृती रुजावी, हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश होता. या उपक्रमामुळे शाळा आणि समाजातील शैक्षणिक नाते अधिक घट्ट होण्यास मदत झाली आहे.
----
सीईओंनी घेतली विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी
राहोली खुर्द येथील शाळेला भेट दिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी थेट वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी फळ्यावर बाराखडी लिहून घेत विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेतले, तसेच इंग्रजी व्याकरणातील काळांविषयी थेट प्रश्न विचारले. अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या अनौपचारिक चाचणीमुळे विद्यार्थ्यांचे भाषिक ज्ञान आणि आकलन क्षमतेचा प्रत्यक्ष आढावा घेता आला.