बुकनवाडी हत्याप्रकरणी
२१ जणांवर गुन्हा दाखल
नऊ आरोपींना ठोकल्या बेड्या, ढोकी पोलिसांची कारवाई
सकाळ वृत्तसेवा ः
धाराशिव, ता. १३ ः तालुक्यातील बुकनवाडी येथे मोटारसायकल नेण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या तुफान हाणामारीत तरुण महेश सुरेश चामे (वय २४) याची हत्या झाल्याची घटना घडली होती. घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, याप्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलिस ठाण्यात अखेर २१ आरोपींसह इतर साथीदारांविरुद्ध खुनासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून नऊ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
शुक्रवारी (ता. ११) रात्री साडेनऊच्या सुमारास बुकनवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी चौकात ही रक्तरंजित घटना घडली होती. याप्रकरणी शनिवारी (ता. १२) मृत तरुणाचे वडील सुरेश आप्पाराव चामे (वय ४०, रा. बुकनवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यावरून बन्सी काळे, पिंटू काळे, देवराव काळे, कोंबड्या काळे, दत्ता काळे, बेगा काळे, शोभा काळे, यमुना काळे, कैलास काळे, पोपट शिंदे, कारकून शिंदे, महादेव शिंदे, मोतीराम काळे, तानाजी काळे, बादल काळे, मुकरा काळे, सचिन शिंदे, वैशाली शिंदे, गितू काळे, विशाल काळे, पापा शिंदे (सर्व रा. बुकनवाडी) आणि त्यांच्या इतर साथीदारांवर गुन्हा नोंदवला आहे.
पाच जखमींवर उपचार सुरू;
पोलिसांचा गावात फौजफाटा
मारुती परगे, काका परगे, करण आवले, सतीश आवले आणि नाना आवले हे पाच जण काठ्या, कुऱ्हाड, कोयता, कत्ती व तलवारींच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.