10th 12th exams | परीक्षा काळात बससेवा, वीजपुरवठा सुरळीत राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

10th 12th exams in March April

परीक्षा काळात बससेवा, वीजपुरवठा सुरळीत राहणार

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल महिन्यात दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. या काळात विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोचता यावे, तसेच परीक्षा देताना परीक्षा हॉलमध्ये प्रकाश, पंखे सुरू असावेत, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची मदत असावी. यासाठी बससेवा, वीजपुरवठा सुरळीत

राहण्यासाठी जिल्ह्यातील केंद्र संचालकांनी महावितरण, एसटी महामंडळ आणि स्थानिक पोलिस स्थानक यांच्याशी पत्रव्यवहार करावा, अशा सूचना विभागीय मंडळ, शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

दहावी, बारावी परीक्षेच्या अनुषंगाने शिक्षण विभाग, शिक्षण मंडळाकडून तयारी सुरू आहे. बारावीची लेखी परीक्षा चार; तर दहावीची लेखी परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा काळात कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहे. परीक्षेच्या वेळेनुसार बसच्या नियोजनासाठी एस. टी. महामंडळ, परीक्षेवेळी वीज खंडित होऊ नये यासाठी महावितरण व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यासाठी मुख्य केंद्र संचालकांनी पत्रव्यवहार करून परीक्षेचे नियोजन करण्याच्या सूचना विभागीय शिक्षण मंडळ आणि शिक्षण विभागाने केंद्र, उपकेंद्रांना दिल्या आहेत. तसेच परीक्षेत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी केंद्र, उपकेंद्रांना घ्यावी लागणार आहे.

अन्यथा अनुदानित, विनाअनुदानित शाळांचे अनुदान बंद करण्यात येणार असून विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून बजावण्यात आले आहे. परीक्षेच्या नियोजनासाठी सोमवारी (ता.२८) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दक्षता समितीची बैठक होणार आहे. औरंगाबाद विभागातील बीड, जालना, औरंगाबाद, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतून बारावीसाठी एक लाख ६५ हजार ८०९ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यासाठी ४०८ केंद्र व १३६० उपकेंद्र; तर दहावीसाठी एक लाख ८१ हजार ६०२ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. त्यासाठी ६२३ केंद्र व २६१४ उपकेंद्रांवर परीक्षा होणार आहेत.

Web Title: Bus Service Power Supply During Examination Period 10th 12th Exams In March April

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top