((( आरोग्य विमा))))
कॅशलेस अप्रूव्हल म्हणजे खिशातून एकही रुपया न देणं नव्हे
हॉस्पिटलचं बिल थेट विमा कंपनी भरणार; चुका टाळणे गरजेचे
...
माझ्याकडे आरोग्य विमा आहे, मग रुग्णालयात उपचार घेताना मला पैसे भरावे लागतील का? हा प्रश्न अनेक रुग्णांना पडतो. रोकडरहित सुविधा (कॅशलेस) म्हणजे रुग्णालयाचे संपूर्ण देयक माफ होणे नव्हे. पॉलिसीच्या अटींनुसार पात्र ठरणारा उपचार खर्च विमा कंपनीकडून रुग्णालयाला थेट दिला जाण्याची सुविधा म्हणजे रोकडरहित दावा. या दाव्याचे पाच टप्पे पुढीलप्रमाणे :
पहिला टप्पा : विमा कंपन्यांच्या यादीत अनेक रुग्णालये असतात. त्यांना नेटवर्क हॉस्पिटल्स म्हणतात. उपचार घेण्यापूर्वी आपले रुग्णालय विमा कंपनीच्या मान्यताप्राप्त यादीत आहे का, हे तपासावे.
दुसरा टप्पा : विमा किंवा त्रयस्थ प्रशासक कक्षाशी (टीपीए डेस्क) संपर्क साधावा. रुग्णालयात दाखल होताना विमा ओळखपत्र व पॉलिसीचा तपशील द्यावा. रुग्णालयाचा विमा कक्ष किंवा त्रयस्थ प्रशासक या रोकडरहित प्रक्रियेत मदत करतो.
तिसरा टप्पा : पूर्व-मंजुरी विनंती यात अत्यंत महत्त्वाची असते. रुग्णालय विमा कंपनी अथवा त्रयस्थ प्रशासकाकडे उपचाराचा अंदाजित खर्च, डॉक्टरांचे निदान व आवश्यक वैद्यकीय कागदपत्रांसह रोकडरहित पूर्व-मंजुरी विनंती पाठवते.
चौथा टप्पा : मंजुरी मिळाल्यानंतर मंजूर रक्कम, मंजुरीची व्याप्ती आणि पॉलिसीनुसार कोणते खर्च पात्र वा अपात्र आहेत, याची माहिती घ्यावी. रोकडरहित मान्यता (कॅशलेस अप्रूव्हल) म्हणजे अंतिम दावा निपटारा (क्लेम सेटलमेंट) नव्हे, हे लक्षात ठेवावे.
पाचवा टप्पा : उपचारादरम्यान कागदपत्रे जतन करणे खूपच आवश्यक असते. त्यातही सर्व वैद्यकीय अहवाल, औषध चिठ्ठ्या (प्रिस्क्रिप्शन), देयके, वैद्यकीय तपासणी अहवाल, संमतीपत्रेआणि सुट्टीसंबंधी (डिस्चार्ज) कागदपत्रे व्यवस्थित जपून ठेवावीत.
सहावा टप्पा : डिस्चार्जच्या वेळी अंतिम देयक तपासा. रुग्णालयातून सुट्टी घेण्यापूर्वी अंतिम देयक, विमा मंजुरी आणि रुग्णाने स्वतः भरावयाची रक्कम तपासावी. वैद्यकीय खर्चाव्यतिरिक्त खर्च (नॉन मेडिकल), सह-हिस्सा (को-पेमेंट), वजावट) किंवा पॉलिसी मर्यादांमुळेकाही रक्कम स्वतः भरावी लागू शकते.
- ॲड. डॉ. प्रमोद चव्हाण
९४२२२०१३९१