२४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचही नाही, प्रशासकही नाही!

२४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचही नाही, प्रशासकही नाही!
Published on
निवडणुका रखडल्या, विकासकामांना ब्रेक -------- चाकूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीची स्थिती, सरपंचासह प्रशासकही नसल्याने अडचणी प्रशांत शेटे चाकूर, ता. ९ : तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींपैकी तब्बल २४ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी २०२६ मध्ये संपली आहे. मात्र, मतदारयादीच्या एसआयआर प्रक्रियेमुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. मुदत संपून सहा महिने उलटली तरी प्रशासनाकडून या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्तीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे सरपंच नाही आणि प्रशासकही नाही, अशा स्थितीत विकासकामांना ब्रेक बसला आहे. सध्या ग्रामपंचायतींचा कारभार केवळ ग्रामसेवकांच्या माध्यमातून सुरू आहे. परिणामी गावपातळीवरील विकासकामे, नवीन निर्णय आणि विविध प्रस्तावांवर परिणाम होत आहे. गावच्या विकासाचा कारभार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालतो. रस्ते, नाली, पाणीपुरवठा, पथदिवे, स्वच्छता यांसह विविध मूलभूत सुविधांसाठी ग्रामपंचायती महत्त्वाची भूमिका बजावतात. तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारीमध्ये संपल्यानंतर लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यानंतर निवडणुका होणे अपेक्षित होते. परंतु एसआयआर प्रक्रियेमुळे निवडणुकीचे वेळापत्रक लांबले आहे. सध्या सरपंच व ग्रामसेवकांवर प्रशासक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे, परंतु त्यांना कोणताही आर्थिक व्यवहार करता येत नाही. ग्रामपंचायतीचा कारभार ग्रामसेवकांकडून पाहिला जात असला तरी लोकप्रतिनिधी नसल्याने गावातील अनेक प्रश्नांवर स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून गावाच्या गरजा प्रशासनापर्यंत पोहोचविणे, विकासकामांना प्राधान्य देणे आणि विविध प्रस्तावांना चालना देणे शक्य होते. मात्र, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये ही लोकप्रतिनिधींची यंत्रणा अस्तित्वात नाही. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी यांना प्रशासक नियुक्त करून कारभार सुरळीत ठेवण्याची आवश्यकता असताना अद्याप प्रशासकांची नियुक्ती झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. अनेक गावात सध्याही पाणी टंचाई असून अधिग्रहणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरु आहे. प्रशासकाची नियुक्ती झाली असती तर विकासकामांचे प्रस्ताव, दैनंदिन प्रशासकीय निर्णय आणि गावाच्या गरजांनुसार आवश्यक बाबींना गती मिळाली असती, अशी नागरिकांची भावना आहे. सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे गावातील विविध विकासकामांबाबत पुढाकार घेणारी स्थानिक लोकप्रतिनिधींची यंत्रणा राहिलेली नाही. त्यामुळे रस्ते दुरुस्ती, नाली बांधकाम, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे, सार्वजनिक ठिकाणांची कामे यांसह विविध विकासकामांवर परिणाम होत आहे. नवीन कामांसाठी प्रस्ताव तयार करणे, त्यांना प्राधान्य देणे आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा अभाव जाणवत आहे. ग्रामपंचायतीचा कारभार हा केवळ कागदोपत्री कामकाजापुरता मर्यादित न राहता गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे निवडणुका कधी होणार, प्रशासकांची नियुक्ती कधी केली जाणार आणि ग्रामपंचायतींना पूर्णवेळ निर्णयक्षम यंत्रणा कधी मिळणार, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. एसआयआरची प्रक्रिया पूर्ण होऊन निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्यास आणखी किती कालावधी लागणार, याकडे २४ गावांचे लक्ष लागले आहे. ---- यागावांची मुदत संपली अजनसोंडा (बु), उजळंब, कडमुळी, कबनसांगवी, जगळपुर, झरी (खु), टाकळगाव, दापक्याळ, नळेगाव, नागेशवाडी, बावलगाव, बोरगाव, ब्रम्हवाडी, केंद्रेवाडी, महाळंगी, महाळंग्रा, महाळंग्रावाडी, राचन्नावाडी, रोहिणा, लिंबाळवाडी, वडवळ नागनाथ, शिवणखेड (बु), शेळगाव, हाडोळी या गावांचा समावेश आहे. --- चाकूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीच्या मुदत संपल्या असून याठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यासाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला असून लवकरच प्रशासकांची नियुक्ती होणार आहे. -संतोष माने, गटविकास अधिकारी चाकूर. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com