चाकूरला नोव्हेंबरमध्येच पाणीटंचाईचे चटके
-----
तालुक्यात ४५ गावांत पाणी अधिग्रहण; विहिरी, विंधनविहिरी आणि तलाव कोरडेठाक, जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर
प्रशांत शेटे
चाकूर, ता. १९ : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यात दुष्काळाचे भीषण परिणाम आता प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. तालुक्यात अवघा ३६४ मिलिमीटर पाऊस झाला असून, तो सरासरीच्या केवळ ४५ टक्के आहे. अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातच शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली असताना आता पाणीटंचाईचे संकटही अधिक गडद झाले आहे.
नोव्हेंबर महिन्यापासूनच तालुक्यातील अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विहिरी, विंधनविहिरी आणि तलाव आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे. सध्या तालुक्यात तब्बल ४५ ठिकाणी पाणी अधिग्रहण करून गावांना पाणीपुरवठा केला जात असून, आणखी अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे येत आहेत. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट किती गंभीर होणार, याची चिंता आतापासूनच सतावू लागली आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये मागील वर्षापासूनच पाणी अधिग्रहणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने भूजलपातळीत मोठी घट झाली आहे. परिणामी, गावातील सार्वजनिक विहिरींसह खासगी विहिरी आणि विंधनविहिरींनीही तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून प्रशासनाला खासगी जलस्रोतांचे अधिग्रहण करावे लागत आहे. सध्या ४५ ठिकाणी अधिग्रहण सुरू असून, पाणीटंचाईची तीव्रता वाढत असल्याने नव्याने अधिग्रहण करण्याची मागणीही वाढत आहे.
नोव्हेंबर महिन्यातच तालुक्यात पाणीटंचाईची ही परिस्थिती निर्माण झाली असल्याने पुढील चार ते पाच महिने अधिक कठीण जाण्याची शक्यता आहे. वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संभाव्य टंचाईग्रस्त गावांचे सर्वेक्षण करून पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. नव्या अधिग्रहण प्रस्तावांवर तातडीने निर्णय घेणे, टँकरची पर्यायी व्यवस्था तयार ठेवणे, उपलब्ध तलावांतील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करणे आणि जनावरांसाठी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे आहे. यंदाच्या अल्प पावसाने तालुक्यातील ग्रामीण जीवनाचे गणितच बिघडवले आहे. खरीप हंगामातील नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अशा तिहेरी संकटात ग्रामीण जनता सापडली आहे. अद्याप हिवाळ्याचे दिवस सुरू असतानाच पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आली आहे. चाकूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बोथी तलावातील पाणी पातळी खालावली असून नगरपंचायतीने पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी होत आहे.
अनेक गावांमध्ये पाण्यासाठी कसरत
तालुक्यातील नागेशवाडी, नांदगाव, अजनसोंडा, सेवापूरतांडा, केंद्रेवाडी, आंबेवाडी, आंबुलगा, वडवळ नागनाथ, कडमुळी यांसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. काही गावांमध्ये अधिग्रहणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत असला, तरी वाढती मागणी आणि उपलब्ध जलसाठ्याची मर्यादा यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे प्रशासनासमोर आव्हान ठरत आहे