esakal | उद्धव ठाकरेंकडे विनंती करूनही झाले नाही, खैरेंचे पुनर्वसन : अंबादास दानवे
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad City news

खैरे यांना राज्यसभेवर संधी मिळावी म्हणून माझ्यासह शहरातील तीन आमदारांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विनंती केली होती. मात्र शेवटी पक्षाने घेतलेला निर्णय सर्वांना मान्यच करावा लागतो, असे दानवे यांनी नमूद केले. 

उद्धव ठाकरेंकडे विनंती करूनही झाले नाही, खैरेंचे पुनर्वसन : अंबादास दानवे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : राज्यसभेवर संधी देऊन शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुनर्वसन करण्यात यावे, यासाठी माझ्यासह आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट यांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विनंती केली. मात्र शेवटी पक्षाने प्रियंका चतुर्वेदी यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. पक्षाचा निर्णय मान्यच करावा लागतो, अशी प्रतिक्रिया आमदार अंबादास दानवे यांनी खैरे प्रकरणावर व्यक्त केली. 

शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज्यसभेसाठी पक्षाकडून संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावरच निशाणा साधल्यामुळे खळबळ उडाली. दोन दिवस ते ‘नॉट रिचेबल’ होते. त्यामुळे खैरेंच्या नाराजीवरून तर्कवितर्क लावले जात होते. दरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत शहरात आले असता, श्री. खैरे यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ‘मी शिवसैनिकच आहे. मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार’ असे सांगत आदित्य ठाकरे यांची माफी मागितली होती.

वाचून तर बघा : इच्छूकांनी सुरू केली कार्यालये, पत्रकेही वाटली, आता खर्च तीनपट 

एकीकडे खैरे नाराज असताना शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी भाजपचे नवनिर्वाचित खासदार डॉ. भागवत कराड यांची भेट घेऊन त्यांना पेढा भरवून खैरेंच्या जखमेवर मीठ चोळले. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत खैरेंच्या नाराजीबाबत पत्रकारांनी प्रश्‍न विचारला असता, श्री. दानवे म्हणाले, खैरे यांचे पक्षासाठी मोठे योगदान आहे. राज्यसभेवर संधी मिळाली नाही म्हणून, भावनेच्या भरात ते बोलले. त्यानंतर त्यांना पश्‍चतापही झाला. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माफीही मागितली. त्यामुळे या विषयावर आता पडदा पडला आहे. खैरे यांना राज्यसभेवर संधी मिळावी म्हणून माझ्यासह शहरातील तीन आमदारांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विनंती केली होती. मात्र शेवटी पक्षाने घेतलेला निर्णय सर्वांना मान्यच करावा लागतो, असे दानवे यांनी नमूद केले. 
 
डॉ. भागवत कराड माझे शेजारी 
तुम्ही डॉ. भागवत कराड यांना पेढा भरवून अभिनंदन केल्याचे कोणाला रुचले नाही, याबाबत पक्षाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा खैरे यांनी दिला आहे. या प्रश्‍नावर दानवे यांनी डॉ. कराड हे माझे शेजारी आहेत. अनेक वर्षांपासूनचे आमचे संबंध आहेत. एवढी छोटी गोष्ट मोठी करण्याची गरज नाही. महाराष्ट्र पुढारलेले राज्य आहे, असे उत्तर दिले. 

क्‍लिक करा : सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालय सुनेसुने 

loading image