

Chhatrapati Sambhajinagar News
esakal
छत्रपती संभाजीनगर: व्यावसायिक सिलिंडर देणे बंद झाले आणि हॉटेलवाले चुलीवर आले. दुसरीकडे घरगुती गॅस मुबलक असल्याचे रोज सांगितले जाते, तरी उन्हातान्हात हजारो नागरिक गॅससाठी रस्त्यांवर रांगा लावत आहेत. कुणाची बुकिंग होत नाही, तर कुणाला बुकिंगनंतरही गॅस मिळत नाही. काही नागरिकांना तर चक्क ‘सिलिंडर डिलिव्हर्ड’ असे संदेश मोबाइलवर येताहेत.
प्रत्यक्षात त्यांना ते मिळालेलेच नाहीत! असा सर्व गॅसगोंधळ सुरू असताना प्रशासनाने ‘आम्ही आता कारवाई करणार’ असा आव आणला आणि तब्बल ११ पथके स्थापन केली. या पथकांमधील अधिकारी-कर्मचारी करतात काय, तर एखाद्या गोदामामध्ये जातात, एजन्सीच्या आजूबाजूला ‘टेहळणी’ करून येतात आणि हात हलवत परत ‘एसी’ कार्यालयात बसून राहतात. दोन दिवसांत या पथकातील एकाही अधिकारी-कर्मचाऱ्याला गॅसचा काळाबाजार दिसला नाही!
जे सर्वसामान्यांना दिसते ते या विभागाला का दिसत नाही? त्यामुळे तपासणीत ‘अर्थ’पूर्ण व्यवहार होत असल्याचा थेट आरोप संतप्त नागरिकांमधून होत आहे.