थेट विदेशी उड्डाणांसाठी कंपन्यांना ‘इन्सेन्टिव्ह’ची ऑफर
----
संभाजीनगरला ‘ग्लोबल’ करण्यासाठी प्रोत्साहन, इमिग्रेशन चेकपोस्टच्या हालचालींनाही वेग
---
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. २० : जागतिक वारसास्थळे आणि औद्योगिक हब अशी ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराला थेट आंतरराष्ट्रीय नकाशावर आणण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने एक पाऊल पुढे टाकले आहे. शहरातून परदेशवारी घडवून आणणाऱ्या विमान कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी प्राधिकरणाने ‘इन्सेन्टिव्ह’चे (प्रोत्साहनपर परतावा) अस्त्र बाहेर काढले. एखादी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सलग वर्षभर सुरू ठेवल्यास कंपन्यांना थेट आर्थिक परतावा देण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे.
अजिंठा आणि वेरूळ यांसारखी जागतिक कीर्तीची लेणी पाहण्यासाठी जगभरातून येथे पर्यटक येतात. शिवाय हे शहर मोठे उद्योग आणि व्यापाराचे केंद्र आहे. सध्या थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा नसल्यामुळे परदेशी पर्यटकांसह स्थानिक उद्योजक आणि व्यावसायिकांनाही मुंबई, दिल्ली किंवा अन्य विमानतळांवरून वेळखाऊ आणि खर्चीक प्रवास करावा लागतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठीच विमानतळ प्राधिकरणाने ही नवी ऑफर आणली आहे. आता कोणती एअरलाइन्स या ऑफरचा फायदा घेत शहरातून पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू करते, याकडे पर्यटन आणि उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
----
ते उड्डाण का रखडले?
शहरातून आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी विमान कंपन्या उत्सुक आहेत. विशेष म्हणजे, वर्ष २०२४ मध्येच एका विमान कंपनीने छत्रपती संभाजीनगर ते थेट बँकॉक ही सेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, विमानतळावर ‘इमिग्रेशन चेकपोस्ट’ची सुविधा नसल्याने हा प्रस्ताव बारगळला आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांची प्रतीक्षा लांबली. आता मात्र या इमिग्रेशन चेकपोस्टच्या मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. ती सेवाही लवकरच सुरू होण्याचे संकेत आहेत.
----
रायपूरसह संयुक्त प्रक्रियेसाठी पाहणी पूर्ण
नागरी उड्डयन मंत्रालयाच्या अखत्यारीतील ११ हून अधिक विमानतळांच्या मोहिमेत छत्रपती संभाजीनगर आणि रायपूर या जोडीचा पहिला क्रमांक लागला आहे. केंद्र सरकारच्या ‘नॅशनल मोनेटायझेशन पाइपलाइन’अंतर्गत या दोन्ही शहरांचे एकाच पॅकेजमध्ये खासगीकरण प्रस्तावित असून, नुकतीच एका एजन्सी समूहाच्या विशेष पथकाने विमानतळाची प्रत्यक्ष पाहणी करून चाचपणी केली. सध्या देशाअंतर्गत सेवा-सुविधांत अव्वल असलेले हे विमानतळ मोठी क्षमता बाळगून आहे. राज्य शासनाने विस्तारीकरणासाठी ७३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, टर्मिनलचे आधुनिकीकरण व आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी इमिग्रेशन यंत्रणाही सज्ज झाली आहे. केंद्राच्या ‘क्लबिंग’ धोरणानुसार रायपूर-संभाजीनगर यांची जोडी करून विमानतळ प्राधिकरवरील खर्चाचा भार कमी केला जाणार आहे.
----
इमिग्रेशन चेकपोस्ट म्हणजे काय?
इमिग्रेशन चेकपोस्ट (आयसीपी) हे देशातील एक अधिकृत तपासणी केंद्र आहे. परदेशातून भारतात येणाऱ्या किंवा भारतातून परदेशात जाणाऱ्या प्रवाशांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाशी संबंधित आवश्यक कायदेशीर प्रक्रिया येथे पार पाडली जाते. या ठिकाणी नियुक्त इमिग्रेशन अधिकारी प्रवाशाचा पासपोर्ट, व्हिसा तसेच इतर आवश्यक प्रवास कागदपत्रांची पडताळणी करतात. प्रवाशाला भारतात कायदेशीर प्रवेश देण्यापूर्वी किंवा भारतातून बाहेर जाण्याची परवानगी देण्यापूर्वी ही तपासणी प्रक्रिया पूर्ण केली जाते. इमिग्रेशन चेकपोस्ट प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय विमानतळे, सागरी बंदरे, आंतरराष्ट्रीय रेल्वेस्थानके आणि देशाच्या आंतरराष्ट्रीय भूसीमा मार्गांवर कार्यरत असतात.
---
अशी आहे प्राधिकरणाची ऑफर
१. नव्या इन्सेन्टिव्ह फॉर्म्युल्यानुसार, आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी देणाऱ्या कंपन्यांना वर्षपूर्तीनंतर थेट आर्थिक लाभ मिळवता येणार आहे.
२. विमान कंपनीला शहरातून सुरू केलेली आंतरराष्ट्रीय सेवा किमान एक वर्ष चालवणे बंधनकारक असेल.
३. ही उड्डाणे आठवड्यातून किमान दोन दिवस असली, तरीही ही सवलत लागू राहील.
४. एका वर्षाच्या यशस्वी सेवेनंतर संबंधित विमान कंपनीला या ‘इन्सेन्टिव्ह’साठी दावा (क्लेम) करता येईल.
---------
(कोट- ABD26J79856 फोटो आवश्यक घ्यावा)
ज्या एअरलाइन्सला आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करायची आहे, त्यांनी ती किमान वर्षभर चालवणे आवश्यक आहे. आठवड्यातून दोन दिवस उड्डाणे असली तरीही चालतील. या सेवेची सर्व नोंद आमच्याकडे ठेवली जाईल. वर्षभर सेवा दिल्यानंतर एअरलाइन्सला परताव्यासाठी क्लेम करता येईल. त्यानंतर आमच्या मुख्यालयाकडून (हेडक्वार्टर) त्यांना ती रक्कम ‘रिइम्बर्स’ (परतावा) केली जाईल.
- शरद येवले, संचालक, छत्रपती संभाजीनगर विमानतळ