छत्रपती संभाजीनगर - शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. ३१ मार्चची ‘डेडलाइन’ (मुदत) हुकल्यानंतर आता जूनची नवी तारीख दिली जात आहे. पण, प्रत्यक्षात शहरात पाणी येण्यासाठी २०२६ उजाडणार आहे. नाथसागरातील (जायकवाडी) जॅकवेलचे (उद्भव विहीर) शंभर टक्के काम पूर्ण होण्यासाठी डिसेंबर उजाडणार आहे.
मुख्य जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असले तरी हायड्रॉलिक चाचणीसाठी तीन ते चार महिन्यांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे शहरासाठी २०२६ चा उन्हाळा देखील त्रासदायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहराचा पाणीप्रश्न २० ते २५ वर्षांपासून गंभीर वळणावर आहे. महापालिकेच्या लेखी एक-दोन त्यानंतर पुढे तीन दिवसांआड पाणी देण्याचे वेळापत्रक असले तरी सध्या शहरात १०ते१२ दिवसांनंतर नळाला पाणी येत आहे.
शहराच्या काही भागांत तीन-चार दिवसांआड नळाला पाणी येते. नवीन शहरात म्हणजेच सिडको, हडकोत दहा-बारा दिवसांआड तेही केवळ पाऊण तास पाणी सोडले जाते. त्यात नळाला वीजपंप लावूनही एक हजार लिटर पाणी मिळणे अवघड होत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त आहेत.
विशेष म्हणजे वाहिनी फुटण्याच्या व तांत्रिक बिघाडाच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे नवी योजना केव्हा सुरू होईल, तहानलेल्या शहरवासीयांना मुबलक पाणी कधी मिळेल, याची प्रत्येकाला आस आहे.
टप्प्यांचे पाणी महागडे
जॅकवेलच्या एका भागाचे काम पूर्ण करून त्यावर पंप लावून पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी शहरात आणण्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रयत्न आहेत. पण, हे पाणी शहरासाठी महागडे ठरणार आहे. जॅकवेलच्या कामासाठी ‘कॉपर डॅम’ तयार केला आहे. जॅकवेल तयार झाल्यानंतर हा डॅम फोडला जाणार आहे. त्यानंतरच जॅकवेलमध्ये पाणी येईल.
डॅम न फोडता जॅकवेलमध्ये पाणी घ्यायचे झाल्यास नाथसागरातून पाणी घेण्यासाठी वेगळे पंप बसवावे लागणार आहेत. म्हणजेच ‘डबल लिफ्ट’ करून पाणी घ्यावे लागणार आहे. त्यासाठी विजेचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे जॅकवेलचे काम पूर्ण करूनच पंप बसविण्याचा विचार करावा, अशा सूचना प्रशासक जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
३० एप्रिलची नवी डेडलाइन
पाणी योजनेचे काम करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ३१ मार्चला पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी शहरात आणू, असे जाहीर केले होते. त्यासोबत पालकमंत्री संजय शिरसाट, सत्ताधारी नेते वारंवार ‘डेडलाइन’ जाहीर करत आहेत. आता ३० एप्रिलची नवी ‘डेडलाइन’ देण्यात आली आहे.
१६ ठिकाणी अडथळे
मुख्य २५०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे केवळ चार टक्के काम शिल्लक असले तरी तब्बल १६ ठिकाणी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे. काही ठिकाणी नाला, ओढे ओलांडून, तर काही ठिकाणी गावांच्या मधून किंवा गावांना टाळून जलवाहिनी टाकावी लागणार आहे. टाकळी फाटा, ढोरकीन, बिडकीन, कवडगाव, चितेगावच्या परिसरात तीन ठिकाणी अडथळे असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘बटरफ्लाय व्हॉल्व्ह’ बसवण्यासाठी, जलवाहिनीच्या हायड्रॉलिक चाचणीसाठी प्रत्येकी आठ ठिकाणी (एकूण सोळा) गॅप सोडण्यात आले. दर चार किलोमीटरवर एक ‘बटरफ्लाय व्हॉल्व्ह’ बसवण्यात येणार आहेत, तर प्रत्येक चार किलोमीटरवर जलवाहिनीची हायड्रॉलिक चाचणी घेतली जाणार आहे.
नेमका उशीर का होणार?
महापालिका प्रशासकांनी गेल्या रविवारी कामांची पाहणी केली. नव्या योजनेतून शहराला प्रत्यक्षात पाणी मिळण्यासाठी २०२६ उजाडेल, असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.
पाणी योजना कार्यान्वित होण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे काम जॅकवेलचे आहे. त्याच्या सध्याच्या कामाची गती पाहता डिसेंबर २०२५ पर्यंत हे काम चालेल.
सध्या ६० टक्के मजूरच काम करतात. जलवाहिनीची हायड्रॉलिक चाचणी पूर्ण करण्यासाठी चार महिने लागतील. त्यामुळे पाणी मिळण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.