Chhatrapati Sambhajinagar : शाळेत पालकावर चाकूहल्ला करणाऱ्या दोघांना अटक Chhatrapati Sambhajinagar Satara police case arrested two accused | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Chhatrapati Sambhajinagar : शाळेत पालकावर चाकूहल्ला करणाऱ्या दोघांना अटक

छत्रपती संभाजीनगर : शाळेतील स्नेहसंमेलन कार्यक्रमात घुसखोरी केलेल्या टवाळखोरांनी एका पालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली होती. प्रकरणात सातारा पोलिसांनी आरोपींपैकी आणखी दोघांना रविवारी (ता. १२) सकाळी अटक केली. दोघांना मंगळवारपर्यंत (ता. १४) पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए. आर. देवरे यांनी दिले.

अक्षय ऊर्फ भैय्या वाहुळ (वय २४, रा. एकता कॉलनी, साईनगर सातारा परिसर) आणि अविनाश ऊर्फ अवी भगवान देवडे (वय २६, रा. नागसेन नगर, उस्मानपुरा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून गुन्‍ह्यात वापरलेला चाकू व कपडे हस्‍तगत करायचे असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती सहायक सरकारी वकील शशिकांत ईघारे यांनी न्‍यायालयाकडे केली होती.

कडुबा सूरचंद राठोड (रा. सातारा तांडा) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, फिर्यादीच्‍या मुलीच्‍या शाळेत स्‍नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता. शाळेत मुलींचे सादरीकरण सुरू असतानाच काही टवाळखोरांनी धिंगाणा सुरू केला. त्यामुळे कडुबा राठोड यांनी टवाळखोरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, स्नेहसंमेलन संपल्यानंतर कडुबा राठोड हे शाळेबाहेर पडले असताना अक्षय वाहुळ आणि अविनाश देवडे याच्यासह तिघांनी त्यांना अडवून मारहाण सुरू केली तसेच अक्षयने फिर्यादीच्या पोटात चाकू भोसकून त्‍यांना गंभीर जखमी केले. प्रकरणात सातारा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल आहे.