

Chhatrapati Sambhajinagar Heat,
esakal
छत्रपती संभाजीनगर, : सप्टेंबरअखेर शहरात उन्हाचा चटका वाढला असून, रविवारी (ता. २७) कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडत ३५.८ अंश सेल्सिअसची नोंद केली. मागील १० वर्षांतील सप्टेंबरच्या कमाल तापमानाचा हा उच्चांक ठरला आहे. गारव्याची चाहूल लागण्याऐवजी उन्हाच्या झळा जाणवत असल्याने, यंदाचा हिवाळाही तुलनेने सौम्य राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.
इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या (आयएमडी) गेल्या १० वर्षांच्या नोंदीनुसार, यापूर्वी सप्टेंबरमधील सर्वाधिक तापमान १३ सप्टेंबर २०१७ ला ३४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. रविवारी नोंदवलेले तापमान त्यापेक्षा १.८ अंशांनी अधिक आहे. रविवारी किमान तापमान २१.८ अंश सेल्सिअस राहिले. यापूर्वी २०१७ मध्ये ३४ अंश, २०२४ मध्ये ३३.९ अंश, २०१८ मध्ये ३३.५ अंश, २०१५ मध्ये ३३.४ अंश, तर २०१४ मध्ये ३३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.