‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’चा आधार
बीड : जिल्ह्यातील मच्छीमार आणि मत्स्यव्यावसायिकांना हक्काचा रोजगार तसेच आर्थिक बळ देण्यासाठी राबविण्यात येणारी ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ आता पूर्णपणे ऑनलाइन झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘महाडीबीटी २.०’ पोर्टलवर अर्ज नोंदणी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अर्ज भरताना व्यावसायिकांची कोणतीही गैरसोय किंवा धावपळ होऊ नये, यासाठी बीड येथील मत्स्यव्यवसाय कार्यालयात एक स्वतंत्र साहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
केंद्राच्या ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने’च्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्यात ही महत्त्वपूर्ण योजना राबविली जात आहे. या अंतर्गत ६ राज्यस्तरीय आणि १९ जिल्हास्तरीय अशा एकूण २५ विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, जुन्या ३ जिल्हास्तरीय योजनांमध्येही कालानुरूप आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. इच्छुक लाभार्थ्यांना आता स्वतःचा आधार क्रमांक आणि आधारशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येईल. याव्यतिरिक्त ज्यांना तांत्रिक अडचण असेल, ते कार्यालयातील साहाय्यता कक्षाची थेट मदत घेऊ शकतात.
-----
कोट :
जिल्ह्यातील मच्छीमार, मत्स्यव्यावसायिक आणि मत्स्य विक्रेत्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे. अर्ज प्रक्रियेत कोणालाही तांत्रिक अडचण येऊ नये आणि ही प्रक्रिया सर्वांसाठी सुलभ व्हावी, यासाठी कार्यालयात स्वतंत्र साहाय्यता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
- भास्कर सानप, सहायक आयुक्त (मत्स्यव्यवसाय), बीड