कर्णपुरा यात्रेतून चार बाल भिक्षेकऱ्यांची सुटका

कर्णपुरा यात्रेतून चार बाल भिक्षेकऱ्यांची सुटका
Published on: 
कर्णपुरा यात्रेतून चार बालभिक्षेकऱ्यांची सुटका --- जिल्हा महिला व बाल विकास विभागाची कारवाई ः बालकांना बालगृहात दाखल --- छत्रपती संभाजीनगर, ता. २२ ः सण-उत्सव आणि यात्रा आणि गर्दीच्या परिसरात फायदा घेत लहान मुलांकडून भिक्षा मागितली जात असल्याचे प्रकार समोर येतात. अशा बालकांना भिक्षावृत्तीतून मुक्त करून त्यांचे संरक्षण आणि पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाने मोहीम राबविली. कर्णपुरा यात्रेदरम्यान सोमवारी (ता. १९) पदमपुरा, कर्णपुरा आणि लगतच्या परिसरात केलेल्या कारवाईत भिक्षा मागणाऱ्या चार बालकांना ताब्यात घेण्यात आले. बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार या चारही बालकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने बालगृहात दाखल करण्यात आले आहे. सण-उत्सव, यात्रा तसेच गर्दीच्या ठिकाणी आणि बाल भिक्षावृत्तीची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणी विभागाकडून अशा मोहिमा राबविल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शोधमोहीम घेण्यात आली. यावेळी चार बालके प्रत्यक्ष भिक्षा मागताना आढळली. त्यांना ताब्यात घेऊन बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात आले. समितीच्या आदेशानंतर त्यांना बालगृहात प्रवेशित करण्यात आले. या मोहिमेत महादेव डोंगरे, कल्पना मोहिते, सुप्रिया इंगळे, आम्रपाली बोर्डे, सोनू राहिंज, दीपक बजारे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. बाल भिक्षावृत्ती रोखण्यासाठी प्रशासनाकडून पथके तयार करण्यात आली असून, नागरिकांनीही अशा बालकांना भीक न देता संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. -- १०९८ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन बालकांना भिक्षा मागताना आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून हस्तक्षेप करण्याऐवजी चाइल्ड हेल्पलाइनच्या १०९८ या क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती मिळाल्यानंतर संबंधित पथक घटनास्थळी जाऊन आवश्यक कार्यवाही करू शकते, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोमल खरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com