((सिटिजन जर्नालिस्ट))
--
ABD26J81071
गळतीमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी
सिडको वाळूज महानगर (१) : या परिसरात आठवड्यातून अवघा एकदाच पाणीपुरवठा होतो. असे असतानाही सिडको महानगर-१ मधील पाइपलाइन रोडवर अनेक ठिकाणी रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर पाणीगळती सुरू असते. एकीकडे नागरिक तहानलेले आहेत आणि दुसरीकडे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. सिडको प्रशासनाने या पाणीगळतीची त्वरित दखल घेऊन ती बंद करावी, तसेच पाण्याचे योग्य नियोजन करून नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करावा.
- हनुमंत प्रल्हादराव खोसे
--
कचरा जाळल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
सिडको वाळूज महानगर (१) : शहरातील विविध परिसरांमध्ये, दुकानांसमोर आणि घरांच्या आजूबाजूला प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणावर साचत आहे. हा कचरा न उचलता तो सरसकट पेटवून दिला जातो. विशेष म्हणजे यंत्रणेचे कर्मचारीही कचरा जाळताना दिसतात. यामुळे सकाळी परिसरात प्रचंड धूर पसरून हवेचे प्रदूषण वाढले आहे. सकाळच्या वेळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना तोंडाला स्कार्फ बांधूनच बाहेर पडावे लागत असून, यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी कचरा उघड्यावर न जाळता तो कचरापेटीतच टाकावा. आपली ही छोटीशी खबरदारी अनेकांचे आरोग्य आणि प्राण वाचवू शकते.
- सुप्रिया विनोद गांधी
---
लोंबकळणाऱ्या इंटरनेट केबलमुळे अपघाताची भीती
सिडको (एन-२) : विद्यार्थी, व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी इंटरनेट अत्यंत आवश्यक झाले आहे. इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या अनेक कंपन्यांमुळे शहरात केबलचे अक्षरशः जाळे पसरले आहे. सेवा खंडित (डिस्कनेक्ट) झाल्यानंतरही अनेक कंपन्या जुन्या केबल तशाच सोडून देतात.
या टाकाऊ केबल सध्या घरांवर, रस्त्यांवर इतरत्र पडून आहेत, तर काही केबल खाली रस्त्यावर धोकादायकपणे लोंबकळत आहेत. यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित प्रशासनाने व कंपन्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन लोंबकळणाऱ्या केबल्स हटवाव्यात.
- सुरेश खांदवे
---