होर्डिंग दिसत नाही, झाड तोडा!
------
कुऱ्हाड सुरूच ः नगरसेवकाचे अधिकाऱ्यांना फर्मान
---------
छत्रपती संभाजीनगर, ता. २२ ः झाडे लावून ती जगविण्यासाठी एकीकडे वृक्षमित्रांची धडपड सुरू असताना दुसरीकडे कधी मिरवणुकीसाठी तर कधी होर्डिंगसाठी झाडे तोडण्याचा शहरात सपाटाच सुरू आहे. महानाट्यासाठी भाजपतर्फे सर्वत्र होर्डिंग लावले जात आहेत. काही ठिकणी हे होर्डिंग दिसत नसल्याने झाड छाटण्यासाठी किंवा तोडण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे तगादा लावला जात आहे. विशेष म्हणजे यासाठी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक प्रतिष्ठा पणाला लावत आहेत.
शहर परिसरात सिमेंटची जंगले वाढत असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे शहरांच्या तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे महापालिकेसोबतच निसर्गप्रेमींकडून खुल्या जागा, रस्ते, दुभाजकांमध्ये झाडे लावून ती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वर्षांनुवर्षे जिवापाड जपून वाढविलेली झाडे दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीकडून छाटली जातात. त्यासोबत गणेश उत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने झाड्यांच्या फांद्या, काही ठिकाणी झाडे तोडण्यात आली. त्यात आता होर्डिंग दिसत नाही, म्हणून झाडाच्या फांद्या छाटण्याचा तगादा काही नगरसेवक लावत आहेत. भाजपतर्फे शहरात महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शहरभर होर्डिंग लावले जात आहेत. ज्याठिकाणी झाडाच्या बाजूला होर्डिंग आहेत, तिथे फांद्या तोडण्यासाठी वारंवार उद्यान विभागाला फोन केले जात आहेत. ऐनकेन प्रकारे शहरात वारंवार झाडांवर कुऱ्हाड चालविली जात असल्याने वृक्षप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.
--------