दुष्काळाशी लढण्यासाठी परभणीतून मिळणार विज्ञानाची साथ

दुष्काळाशी लढण्यासाठी परभणीतून मिळणार विज्ञानाची साथ
Published on
हवामान बदलाचा घेता येणार अचूक वेध --- परभणीत अत्याधुनिक केंद्र कार्यान्वित, मराठवाड्याला लाभ -- सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. ४ : हवामान बदल, अनियमित पाऊस, वाढते तापमान, वारंवार उद्‍भवणाऱ्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे मराठवाड्यातील शेतीसमोर निर्माण झालेल्या आव्हानांचा अधिक अचूकपणे अभ्यास करण्यासाठी परभणी येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) पुरस्कृत अत्याधुनिक एडी-कोव्हेरिएन्स स्टेशन कार्यान्वित करण्यात आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर उभारण्यात आलेले हे केंद्र मराठवाड्यातील जल, ऊर्जा, कार्बन प्रवाहांचा प्रत्यक्ष जमिनीवरील अभ्यास करणारे महत्त्वाचे संशोधन केंद्र ठरणार आहे. परभणीत उभारण्यात येणाऱ्या एडी-कोव्हेरिएन्स केंद्रामुळे मराठवाड्यातील शेतीवर हवामान बदलाचा नेमका परिणाम समजण्यास मदत होणार आहे. या केंद्रातून पिकांचा पाण्याचा वापर, बाष्पीभवन-बाष्पोत्सर्जन, कार्बन डायऑक्साइडची देवाणघेवाण आणि ऊर्जा संतुलन यांचे अचूक मापन केले जाणार आहे. मराठवाडा हा निमशुष्क आणि अवर्षणप्रवण प्रदेश असल्याने पाण्याचा योग्य वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. या केंद्रातून मिळणाऱ्या दीर्घकालीन माहितीच्या आधारे पिकांना किती पाणी द्यावे, सिंचन कधी करावे आणि पाण्याची बचत कशी करावी, याबाबत अधिक अचूक शिफारसी करता येतील. हवामान बदल आणि दुष्काळाचा पिकांवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी या केंद्रातील माहिती उपयुक्त ठरणार आहे. त्यातून दुष्काळसहनशील पीक व्यवस्थापन, योग्य सिंचन आणि हवामान-लवचिक शेतीपद्धती विकसित करता येतील. यामुळे परभणीचे महत्त्व कृषी हवामानशास्त्र आणि हवामान बदल संशोधनाचे केंद्र म्हणून आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच स्थानिक हवामानावर आधारित अधिक अचूक कृषी सल्ला शेतकऱ्यांना देणे शक्य होईल. --- उपग्रहाच्या माहितीस जमिनीवरील आरसा या केंद्राचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इस्रोच्या उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे प्रत्यक्ष जमिनीवरील निरीक्षणांशी प्रमाणीकरण करता येणार आहे. म्हणजेच उपग्रहातून एखाद्या क्षेत्रातील पीक, पाण्याची उपलब्धता किंवा हवामानाशी संबंधित माहिती मिळाल्यानंतर तिची प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीशी तुलना करता येईल. यामुळे भविष्यात उपग्रहाधारित कृषी व हवामान माहिती अधिक अचूक करण्यास मदत होईल. मोठ्या भौगोलिक क्षेत्रासाठी हवामान आणि कृषीविषयक अंदाज विकसित करताना परभणीतील हे केंद्र महत्त्वाचा ग्राउंड ट्रुथ डेटा उपलब्ध करून देऊ शकते. --- ((कोट))) हे केंद्र मराठवाड्यातील शेतीचे भवितव्य अधिक अचूकपणे समजून घेण्यासाठी उभारलेली वैज्ञानिक प्रयोगशाळा ठरणार आहे. पाणी वाचविणे, पीक उत्पादन टिकविणे, दुष्काळाचा परिणाम कमी करणे आणि हवामान बदलाशी जुळवून घेणारी शेती विकसित करणे या सर्वच बाबींमध्ये या केंद्रातून मिळणारा दीर्घकालीन डेटा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. - डॉ. इंद्र मणी, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com