

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील बहुचर्चित सभेला मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर येत्या काही वेळातच सुरुवात होणार आहे. या सभेकडे राज्यभरातून सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना संभाजीनगर शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. दरम्यान मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत, त्या निमित्ताने मुख्यमंत्री ठाकरे कोणावर निशाणा साधणार तसेच औरंगाबादच्या नामांतरावरही मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहीले आहे. (CM Uddhav Thackeray Shiv Sena Aurangabad rally Live updates)
उद्धव ठाकरे : सरकार पडत नाही मग कोणाच्या मागे ईडी लाव सीबीआय लाव.. जरूर लावा. पण काश्मीरमध्ये जे गोळ्या घालतायत त्या अधिकार्यांनी तिकडे जाऊन जाऊन दाखवावं, काश्मीरी पंडीत घाबरून घर सोडतायत, कोणी एक मायेचा पुत त्यांच्या बाजून बोलायला तयार नाही. सगळे प्रवक्ते तोंडात बोळे कोंबून गप्प आहेत. एकातरी भाजपच्या प्रवक्त्याने यावर दात उचकटलेत. बाळासाहेबांचा पुत्र, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून जेजे शक्य आहे ते केल्याशिवाय राहणार नाही. इथं येऊन बांग्लादेशी येऊन राहत असतील, तर माझ्याच देशातील काश्मिरी पंडीतांना का राहता येत नाही
उद्धव ठाकरे : महाराष्ट्रचं मुख्यमंत्री पद तेही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत...२५-३० वर्षे ज्यांना मित्र म्हणून ज्यांना मांडीवर बसवलं होतं तो उरावर नाचायला बघायला लागला आणि ज्यांच्याबरोबर भांडत होतो त्यांनी आपल्याला मान देऊन सरकारमध्ये महाराष्ट्राचा विकास करून घेण्याची आणि देण्याची साथ दिली आहे. जो मित्र होता तो हाडवैरी झाला आणि वैरी मित्र झाले आहेत.
उद्धव ठाकरे : भाजपची भूमिका देशाची भूमिका होवू शकत नाही. भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यामुळे देशावर नामुष्की ओढावली हे तुम्हाला मान्य आहे का? देशाच्या पंतप्रधानांचा फोटो कचराकुंड्यांवर लावला गेला त्याचं काय?
उद्धव ठाकरे : आम्ही दुसर्या धर्माचा द्वेष करत नाही.. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. भाजप प्रवक्त्यांनी प्रेषितांचा अपमान करण्याचा संबंध काय? आपल्या देवी-देवतांचा अपमान करायचा नाही तसं त्यांच्याही देवतांचा अपमान करायचा नाही.
उद्धव ठाकरे : हिंमत असेल तर काश्मीरमध्ये जाऊन पंडीतांची रक्षा करा, नामर्दांच हिंदूत्व आम्हाला शिकवू नका, मर्द असाल तर काश्मीरमध्ये जाऊन त्यांची रक्षा करा.
उद्धव ठाकरे : शहराचं नाव बदलू शकतो, मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील
उद्धव ठाकरे : जर तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असेल तर नुसतं नामांतर नाही तर संभाजी राजेंना अभिमान वाटेल असं शहर तयार करायचं आहे. नावाला सार्थ असं माझं शहर असलं पाहीजे. संभाजीनगर नाव करणार हे वचन बाळासाहेबांनी दिलं आहे ते पुर्ण करणार, विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राने का अडवून ठेवला.
उद्धव ठाकरे : शस्त्रक्रिया झाल्यानंतर ६ महिन्यानंतर मुंबईच्या बाहेर पाऊल टाकलं. हे पहिलं पाऊल मराठवाड्यात टाकलं. आजचा दिवस म्हणजे शिवसेनेने मराठवाड्यात पहिलं पाऊल टाकला तो आहे. एवढ्या वर्षांनीही शिवसेनेची ताकद तेवढीच आहे, उलट वाढत आहे. मैदानात बसायला जागा नाही. तुमच्या रुपाने तुळजाभवानीचं रुप पाहतो आहे. मी पाणी प्रश्नावर बोलणार आहे, पाठ न दाखवता पाणी प्रश्न असतानाही मी जनतेसमोर जातोय, हा प्रामाणिकपणा आहे.
संजय राऊत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने देशाला दिशा दिली आहे, संपूर्ण देश उद्धव ठाकरे यांच्याकडे आशेने पाहतोय.
संजय राऊत : काश्मीरी पंडितांना मदत करण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं तेच काम उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली करायचं आहे.
संजय राऊत : ३७ वर्षापूर्वी कोणाला वाटलं देखील नसेल की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून संभाजीनगर शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनी उपस्थित राहतील. मुख्यमंत्र्याची आजची ही विराट सभा दिल्लीला हलवल्याशिवाय राहाणार नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सभेच्या ठिकाणी पोहचले असून काही वेळेतच ते व्यासपीठावर पोहचतील त्यानंतर ते उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करतील.
सुभाष देसाई : विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव देण्यासाठी ठराव केंद्राला पाठवला पण केंद्राने कारवाई केली नाही. इथं ताकद लावायची सोडून भाजप नेते येथे फुगड्या घालत बसले आहेत.
सुभाष देसाई : औरंगाबादमधील पाणी पातळी वाढली आहे. शहरासाठी उद्धव ठाकरे यांनी १,६८० कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला आहे. ही पाणी योजना वेळेत पूर्ण करून पाणी प्रश्न सोडवला नाही, तर ठेकेदाराला तुरूंगात टाकण्याचा मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला असे ते म्हणाले.
भाजपवाले मातोश्रीवर, उद्धव ठाकरे, वरूण देसाईंवर तसेच आमच्यावर बोलणार असाल तर आम्ही सहन करणार नाही. किरीट सोमय्या आमच्याबद्दल बोलले तर त्यांना औरंगाबादमध्ये येऊ देणार नाही असे खैरे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं औरंगाबाद विमानतळावर दाखल झाले आहेत, यानंतर ते त्यांच्या हॉटेलकडे जातील आणि त्यानंतर ते सभेच्या ठिकाणाकडे जाणार आहेत. सभेच्या ठिकाणी शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
सभेसाठी उद्धव ठाकरे औरंगाबाद शहरात ज्या हॉटेल मध्ये काही काळासाठी थांबणार होते त्या हॉटेलच्या बाहेर भाजप कार्यकर्ते जमले होते. भाजप कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांना औरंगाबादच्या पाणीप्रश्नी निवेदन देण्यात येणार होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
CM उद्धव ठाकरे यांच्या या सभेत व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेदरम्यान व्यासपीठावर छत्रपती संभाजी राजे यांचा पुर्णाकृती पुतळा पहिल्यांदाच ठेवण्यात आला आहे, त्यामुळे आज मुख्यमंत्री ठाकरे औरंगाबादच्या नामांतराची घोषणा करतील का? याबद्दल देखील चर्चा सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.