esakal | महापालिकेच्या त्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांनी लावल्या इथे रांगा...
sakal

बोलून बातमी शोधा

Corona News Aurangabad

नागरिकांसाठीच्या १६ ठिकाणच्या शिबिराचे स्थळ जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शनिवारी सकाळी दहापासून नागरिकांसाठी सुरू झालेल्या तपासणी केंद्रांवर गर्दी केली.

महापालिकेच्या त्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांनी लावल्या इथे रांगा...

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद ः शहरातील बाजारपेठा रविवारपासून (ता.१९) सुरू होणार असल्याने महापालिकेने शेवटच्या दिवशी शनिवारी (ता. १८) जास्तीत जास्त अँटीजेन चाचण्या करण्याचे नियोजन केले होते; मात्र याठिकाणी नागरिकांसोबतच व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे महापालिकेचे संपूर्ण नियोजन कोलमडून पडले. शिबिरांच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाल्याने प्रशासनाने जाधववाडी, भावसिंगपुरा आणि देवळाई येथे अतिरिक्त पथक पाठविले. 

व्यापाऱ्यांसाठी तपासणी शिबिर दुपारी तीननंतर सुरू होतील, असे महापालिकेने जाहीर केले होते. मात्र, या तपासण्या कुठे होणार हे निश्‍चित नव्हते. दुसरीकडे नागरिकांसाठीच्या १६ ठिकाणच्या शिबिराचे स्थळ जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शनिवारी सकाळी दहापासून नागरिकांसाठी सुरू झालेल्या तपासणी केंद्रांवर गर्दी केली. टीव्ही सेंटर, जाधववाडी, पुंडलिकनगर, भावसिंगपुरा, देवळाई केंद्रांवर मोठ्या प्रमाणात व्यापारी जमा झाले. आमची तपासणी आधी करा व प्रमाणपत्र द्या, असा आग्रह अनेकांनी धरला. आरेफ कॉलनीत तर व्यापाऱ्यांनी भांडण केले. या वादात महापालिकेचे नियोजन कोलमडून पडले. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दुपारी तातडीने बैठक घेतली.

व्यापाऱ्यांसाठी दुपारी तीन वाजेनंतर शहरात तपासणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पैठणगेट, जुना मोंढा, औरंगपुरा, शहागंज, रिलायन्स मॉल आदी ठिकाणी तातडीने तपासणी केंद्र सुरू करण्यात आली. तत्पूर्वी महापालिकेच्या टास्क फोर्सने ऐनवेळी जाधववाडी, देवळाई, भावसिंगपुरा आदी ठिकाणी अतिरिक्त तपासणी पथक पाठवण्याचा निर्णय घेतला. 

सुरक्षित अंतराचा फज्जा 
शिबिराच्या ठिकाणी मोठी गर्दी झाल्यामुळे सुरक्षित अंतराचा पूर्णतः फज्जा उडाला. अनेक जण तर ढकला-ढकली करीत होते. त्यांना रोखण्यासाठी महापालिकेकडे कर्मचारीदेखील नव्हते. 

दोन तास ताटकळले व्यापारी 
सिडकोतील कामगार चौकातील कम्युनिटी सेंटरमध्ये परिसरातील व्यापारी जमा झाले; मात्र दोन तास वाट पाहूनदेखील महापालिकेचे पथक फिरकले नाही. या ठिकाणी दुपारी चारची वेळ व्यापाऱ्यांना देण्यात आली होती. एक तास आधीच परिसरातील व्यापाऱ्यांनी गर्दी केली; मात्र पथक न आल्याने व्यापाऱ्यांनी माजी नगरसेवक बालाजी मुंढे यांच्याकडे विचारणा केली, त्यांनी शिबिर रद्द झाल्याचे सांगत सर्व व्यापाऱ्यांना रिलायन्स मॉलजवळील शिबिरात जाण्याची सूचना केली.

loading image