esakal | औरंगाबादमध्ये लसीकरण पुन्हा सुरू, ४० हजार लसी मिळाल्या

बोलून बातमी शोधा

corona vaccination

औरंगाबादमध्ये लसीकरण पुन्हा सुरू, ४० हजार लसी मिळाल्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा साठा संपल्याने शुक्रवार, शनिवारी बहुतांश केंद्रांवरचे लसीकरण बंद होते. आता शासनाकडून ४० हजार लसी प्राप्त झाल्याने सोमवारपासून (ता.२६) जिल्हाभरातील लसीकरण पूर्ववत सुरू होणार आहे. दरम्यान, २५ एप्रिलपर्यंत जिल्‍हाभरात तीन लाख ८९ हजार ९०८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांचा समावेश आहे.

लसीकरण करून घेण्याविषयी जनजागृती केली जात आहे. त्यामुळे ४५ वर्षांपुढील नागरिकांकडून लसीकरणासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महापालिका प्रशासनाने शहरात प्रत्येक वॉर्डात केंद्र सुरू करून लसीकरणाची जंबो मोहीम हाती घेतली आहे. मात्र, गेल्या शुक्रवारी लस संपल्याने बऱ्याच केंद्रांवरचे लसीकरण बंद पडले होते.

जिल्ह्यातील अनेक केंद्रावरही अशीच स्थिती होती. या पार्श्वभूमीवर लसीकरणासंदर्भातील जिल्हा संनियंत्रण अधिकारी डॉ. महेश लड्डा यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, जिल्ह्यासाठी आता ४० हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. यापैकी २५ हजार महापालिकेला तर १५ हजार लसी जिल्हा परषदेला मिळाल्या आहेत. त्यामुळे सोमवारपासून (ता.२६) लसीकरण पूर्ववत सुरू होईल. ४५ वर्षांवरील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

आतापर्यंत ३ लाख ८९ हजार जणांचे लसीकरण-

डॉ. लड्डा म्हणाले, २५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात तीन लाख ८९ हजार ९०८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आहे. त्यात ग्रामीण भागातील एक लाख ७३ हजार १३३ जणांनी पहिला तर १३ हजार ९७२ जणांची दुसरा डोस घेतला. त्यानुसार ग्रामीण भगात एक लाख ८७ हजार १०५ जणांनी लस घेतली आहे. शहरात एक लाख ७० हजार ९२५ जणांनी पहिला तर ३१ हजार ८७८ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यानुसार शहरात दोन लाख दोन हजार ८०३ जणांचे लसीकरण झाले आहे.